पाच महिन्यांनंतर ओल्ड मंक पुन्हा बाजारात येण्याची शक्यता, नव्या लेबलसह विक्रीचा मार्ग मोकळा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गेले पाच महिने ठप्प असलेली ओल्ड मंक रमची विक्री महाराष्ट्रात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने लेबलवरील मजकूर बदलायला तयारी दाखवली असून उच्च न्यायालयातील याचिकाही मागे घेतली आहे.
महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी एक बातमी समोर आली आहे. दिवाळीत मद्यप्रेमींना ही गुड न्यूज मिळाली आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या ओल्ड मंक रमची चव महाराष्ट्रात पुन्हा एकदा चाखायला मिळणार आहे. गेले पाच महिने ठप्प असलेली ओल्ड मंकची विक्री लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहे. कंपनी नव्या लेबलसह हे उत्पादन बाजारात आणायला सज्ज आहे. बाटलीच्या लेबलवरचा मजकूर बदलायला कंपनीने तयारी दाखवली आहे. शिवाय मुंबई उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यामुळे विक्रीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मे महिन्यात खोपोली येथील कारखान्याची पाहणी केली होती. ओल्ड मंक तयार करण्यासाठी न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंग वापरले जात असल्याचे त्यात समोर आले. त्यामुळे हे उत्पादन यापुढे फक्त रम म्हणून विकता येणार नाही, असा आक्षेप प्राधिकरणाने घेतला होता. शिवाय '७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड' हे वर्णनही चुकीचे आहे, कारण हे मद्य लाकडी पिंपात मुरवलेले नाही, असे म्हणत प्राधिकरणाने विक्री रोखली होती.
FSSAI च्या नियमांनुसार ठरवून दिलेले तांत्रिक घटक वापरूनच फ्लेवर देण्याची मान्यता आहे. मात्र तपासात असे दिसून आले की ओल्ड मंक तयार करताना बाहेरून कृत्रिम फ्लेवर्स मिसळले जायचे आणि हे मद्य 'स्टँडर्ड अल्कोहोलिक ड्रिंक' म्हणून बाजारात विकले जायचे. सर्वात गंभीर बाब म्हणजे बाटल्यांच्या लेबलवर या कृत्रिम मिश्रणाचा, म्हणजे आर्टिफिशियल फ्लेवरचा, कोणताही उल्लेख केला जात नसे. ही उघडउघड ग्राहकांची फसवणूक मानली जाते.
या निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनीने लेबलवर 'अतिरिक्त स्वाद' असे ठळकपणे छापायला आणि '७ वर्षे जुने' हे वर्णन वगळायला सहमती दर्शवली. कंपनीने २ नोव्हेंबर रोजी याचिका मागे घेतली होती.
मागील पाच महिन्यांपासून ओल्ड मंकची विक्री थांबल्यामुळे राज्य सरकारला सुमारे ३५० कोटी रुपयांच्या अबकारी महसुलाचा फटका बसला आहे. महाराष्ट्राला मागील वर्षी सर्व प्रकारच्या मद्यविक्रीतून २९,९५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. आता नव्या पॅकिंगसह ओल्ड मंक पुन्हा बाजारात येणार आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.