वरोरा : दारू पिऊन बीडीओंच्या दालनात घुसलेल्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
वरोरा पंचायत समितीच्या कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत घुसून गटविकास अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चिमूर पंचायत समितीतील ग्रामसेवकावर वरोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मारोतीराव मुंडकर यांच्या दालनात एका ग्रामसेवकाने दारूच्या नशेत घुसून गोंधळ घातल्याची घटना घडली असून याप्रकरणी वरोरा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिमूर पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेला ग्रामसेवक विवेक तितरे असे या व्यक्तीचे नाव आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तसेच अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता घडली. त्यावेळी गटविकास अधिकारी गजानन मुंडकर (वय ३३) हे कार्यालयातील आपल्या दालनात नेहमीचे प्रशासकीय काम पाहत होते. याचवेळी विवेक तितरे मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या दालनात अचानक शिरला आणि विनाकारण मोठ्याने आरडाओरड करू लागला. कार्यालयातील परिचर ज्योती धोंगडे यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण नशेत असलेल्या तितरेचा आरडाओरड थांबला नाही. अखेर मुंडकर यांनी स्वतः त्याला विचारले की प्रकरण काय आहे आणि तो कोण आहे. त्यावर त्याने आपले नाव विवेक तितरे असून चिमूर पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी कार्यालयात हजर असलेल्या प्रणव बक्षी यांनी तितरे हा आपला बॅचमेट असल्याचे ओळखून अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
यानंतर मुंडकर यांनी त्याला सुट्टी घेऊन आला आहात का असा साधा प्रशासकीय प्रश्न विचारला, आणि इथेच तितरेचा संताप अनावर झाला. "मी राजा आहे, मला सुट्टीची गरज नाही, मला कोणी विचारत नाही, मी तुम्हाला बांधील नाही आणि मी इथला कर्मचारीही नाही," असे उद्धटपणे बोलत त्याने गोंधळ सुरूच ठेवला. मुंडकर यांनी त्याला समजावले की तो स्वतः शासकीय कर्मचारी असल्याने दारू पिऊन अशा पद्धतीने कार्यालयात येणे योग्य नाही. हे ऐकताच तितरे आणखी भडकला, खुर्चीवरून उठून त्याने गटविकास अधिकाऱ्यांना उद्देशून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता "तू मला विचारणारा कोण, तुला बघून घेतो, तुझ्यावर अॅट्रॉसिटी लावीन" अशी थेट धमकीही त्याने दिली, आणि त्यामुळे कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.
कार्यालयात वाढता गोंधळ बघून मुंडकर यांनी तत्काळ वरोरा पोलीस ठाण्याला फोन केला. पोलिसांना फोन गेल्याचे लक्षात येताच तितरे आरडाओरड करत तिथून निघून गेला. यानंतर मुंडकर यांनी स्वतः वरोरा पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवेक तितरेविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२१ म्हणजे शासकीय कामात अडथळा, कलम २९६ म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य आणि कलम ३५१(२) म्हणजे धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला. ठाणे प्रभारी निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गौरकार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा शासकीय कार्यालयात मद्यधुंद कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यालाच धमकी दिल्याच्या या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.