वर्ध्यात गुंतवणूक फसवणूक: वर्षभर फरार आरोपी छत्तीसगडमधून पकडला, कारवाई पूर्ण
वर्ध्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात एका फरार आरोपीला अटक केली आहे. देवळी पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ०७१९/२०२४ मध्ये आरोपी असलेला पुष्पक किशोर पटले, रा. तिरोडा, जि. गोंदिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ७,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बीएनएस कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३(५) तसेच एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांना पीव्हीआर मल्टीट्रेडिंग लॅब या फर्मच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. ही फर्म वर्ध्यातील आर्वी नाका इथे आहे. आरोपींनी फिर्यादी आणि इतरांकडून पैसे घेतले आणि त्याबाबत हमीपत्रही लिहून दिले, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. सुरुवातीला गुंतवणुकीवर काही मोबदलाही दिला गेला, पण नंतर परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली. यातून फिर्यादी आणि इतर साक्षीदारांची मिळून एकूण ६२,०२,००० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. फिर्यादीने ०८-०८-२०२४ रोजी दिलेल्या लेखी तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपास पुढे गेल्यावर गुंतवणूकदारांची एकूण फसवणूक १,०७,५०,००० रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात याआधीच ९३,०६,६४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पीव्हीआर मल्टीट्रेडिंग लॅब या फर्मचा संचालक विक्रम ज्ञानेश्वर पर्बत, रा. बोरगाव मेघे, वर्धा याला १९-०८-२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो वर्धा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
विक्रम पर्बतचा या गुन्ह्यातील साथीदार पुष्पक पटले हा गेली अनेक वर्षे स्वतःची खरी ओळख लपवून राज्याबाहेर राहुल वर्मा या बनावट नावाने राहत होता आणि पोलिसांची अटक चुकवत फरार होता. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने पुणे आणि छत्तीसगड या रूटवरील त्याच्या हालचालींचा अभ्यास करून शोध घेतला आणि त्याला छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील पुराणी भिलाई ३, ऐकता नगर इथून ताब्यात घेतले. त्याला या गुन्ह्यात १७-०९-२०२६ रोजी अटक करण्यात आली आणि १७-०९-२०२६ ते २१-०९-२०२६ या काळात त्याची पीसीआर घेण्यात आली. त्याच्याकडून महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही कार (क्रमांक एमएच ३२ सी ७७२१, किंमत ७,००,००० रुपये), अॅपलचा १४ प्रो मॅक्स मोबाईल (किंमत ४०,००० रुपये) आणि एचपी कंपनीचे दोन लॅपटॉप (किंमत ४०,००० रुपये) असा एकूण ७,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार निकेश गुजर, कुणाल डांगे, राजेश पाचरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अंकित जिभे यांनी ही कारवाई पार पाडली.