टीनएज मुलं आईवर चिडून बोलतात? रागाच्या आधी या गोष्टी लक्षात ठेवा, पालकत्व तज्ज्ञांचा सल्ला
14 ते 19 वयोगटातील मुलं अनेकदा रागाच्या भरात आईला उलट उत्तर देतात. इन्स्टाग्रामवरच्या maonduty या पॅरेंटिंग चॅनलवर शेअर झालेल्या व्हिडिओत अशा वेळी काय लक्षात ठेवायचं याबद्दल पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
घरात टीनएज मुलं असतील तर एक गोष्ट हमखास घडते, कधीतरी मूल रागाच्या भरात आईला उलट बोलतं आणि नंतर आईलाही वाईट वाटतं आणि मुलालाही अपराधी वाटतं. याच विषयावर इन्स्टाग्रामच्या ओळखीच्या पॅरेंटिंग चॅनल maonduty वर एक व्हिडिओ शेअर झाला असून त्यात किशोरवयीन मुलांसाठी एक गोड आणि खोल संदेश दिलाय. पुढच्या वेळी रागाच्या भरात आईला काही बोलण्याआधी या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा, असं यात सांगितलंय.
सगळ्यात आधी पालकांसाठी एक मुद्दा आहे, तो म्हणजे पालकांनी हुकूमशहा नाही तर मार्गदर्शक व्हायला हवं. पालकत्व तज्ज्ञांच्या मते मुलं आता मोठी होण्याच्या टप्प्यावर असतात आणि आयुष्यातल्या अनेक बदलांशी झगडत असतात. अशा वेळी त्यांच्यावर सतत ओरडत राहणं किंवा त्यांना बांधून ठेवणं योग्य नाही, तर त्यांना योग्य दिशा दाखवणारा प्रेमळ मार्गदर्शक बनणं गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आई तुमच्या विरोधात नाहीये याची खात्री पटवून घ्या. टीनएजमध्ये आईचे टोमणे किंवा घातलेली बंधनं कधीकधी अतिरेकी वाटू शकतात आणि आपलं स्वातंत्र्य संपवायचंय असं वाटू शकतं. पण प्रत्येक निर्बंधामागे नियंत्रणाचाच विचार असतो असं नाही. आई रागाच्या भरात मोठ्यानं बोलली किंवा बोलण्याची पद्धत चुकीची असली तरी लगेच ती आपल्या विरोधात आहे असं समजू नये, कारण अनेकदा बोलणं बरोबर असतं फक्त सांगण्याची पद्धत चुकते. त्यामुळे उत्तर देण्याआधी स्वतःला विचारा, आईला खरंच माझं वाईट वाटतं का, हा प्रश्न वाद तिथेच थांबवू शकतो.
तिसरा मुद्दा असा की प्रत्येक निर्बंधाचा अर्थ नियंत्रण असा होत नाही. फोन वापरू नकोस किंवा रात्री उशिरा बाहेर राहू नकोस अशा सूचना नियंत्रणासारख्या वाटतात, पण पालकांना मुलाला आवेगपूर्ण निर्णयांपासून वाचवायचं असतं. मित्र, नातेसंबंध, करिअर किंवा सोशल मीडियाच्या दबावामुळे मूल घाईत निर्णय घेऊ शकतं, त्यामुळे पालकांची काळजी फक्त नियंत्रण म्हणून बघू नये.
चौथी गोष्ट म्हणजे कठोर शब्द आईच्या मनाला खोलवर लागतात. मुलाला एकटं राहायचं असणं, स्पेस हवी असणं नॉर्मल आहे, पण रागाच्या भरात 'माझ्याजवळ नको राहूस' असं म्हटलं तर मुलासाठी तो क्षणिक राग असतो, पण आईच्या मनात तो बराच काळ टोचत राहतो.
पाचवा आणि शेवटचा मुद्दा असा की रागाचं खरं कारण अनेकदा ताण असतो, आई नाही. शाळेचा ताण, परीक्षा, करिअर, मैत्री यामुळे आलेला राग जवळच्या व्यक्तीवर निघतो आणि ती व्यक्ती बऱ्याचदा आईच असते. वेळ खूप वेगानं जातो आणि एक दिवस मूल स्वतःच्या आयुष्यात स्थिरावल्यावर त्याला जाणवतं की आई अगदी बरोबर होती, हे तज्ज्ञ सांगतात.