मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:27 IST

TET पेपरफुटी: बुटाच्या इनसोलमध्ये लपवून प्रश्नपत्रिका बाहेर, 3500 पानी चार्जशीट दाखल

आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमधून अवघ्या 8 हजार रुपयांसाठी टीईटीच्या प्रश्नपत्रिका चोरल्याचे एसआयटीच्या चार्जशीटमधून समोर आले आहे.

TET पेपरफुटी: बुटाच्या इनसोलमध्ये लपवून प्रश्नपत्रिका बाहेर, 3500 पानी चार्जशीट दाखल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीमधील गैरव्यवहार प्रकरणात विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने भिवंडीतील अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल 3500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या चार्जशीटमधून पेपरफुटीसाठी वापरण्यात आलेली क्लृप्ती उघड झाली असून, कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही अवघ्या 8 हजार रुपयांसाठी हा प्रकार घडवण्यात आला होता. आग्रा येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये हे सगळं घडलं.

आग्रा येथील महीम पत्रण प्रायव्हेट लिमिटेड या प्रिंटिंग प्रेसमध्ये टीईटीच्या प्रश्नपत्रिकांची छपाई सुरू होती. प्रेसभोवती माजी सैनिकांचा पहारा होता आणि सुरक्षाव्यवस्था अतिशय कडक ठेवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांची कसून अंगझडती घेतली जायची, पण सुरक्षारक्षकांचं लक्ष बुटांच्या इनसोलकडे कधी गेलंच नाही. नेमकी हीच त्रुटी हेरून प्रेसमध्ये काम करणाऱ्या नरेशकुमार उर्फ निक्की याने छापील प्रश्नपत्रिकांच्या घड्या करून त्या बुटाच्या इनसोलखाली लपवल्या आणि सहज बाहेर काढल्या.

या कामात बाबूलाल नावाचा आणखी एक कर्मचारी सामील होता. तो प्रेसच्या खोलीतून प्रश्नपत्रिका काढून नरेशकुमारकडे द्यायचा आणि नरेशकुमार त्या बुटात लपवून बाहेर घेऊन यायचा. 15 ते 17 जून या तीन दिवसांत सलग पेपर-1 आणि पेपर-2 चे चारही संच अशाच पद्धतीने प्रेसमधून बाहेर काढण्यात आले.

प्रिंटिंग प्रेसमध्ये महिन्याला 12 ते 15 हजार रुपये कमावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला रोख 8 हजार रुपये दिले गेले होते. याशिवाय प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात त्यांना मोठा प्लॉट देण्याचं, घर बांधून देण्याचं आणि मुलाचं लग्न लावून देण्याचंही आमिष दाखवण्यात आलं होतं.

प्रेसमधून चोरलेल्या याच प्रश्नपत्रिकांचे संच पुढे मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ता याच्यापर्यंत पोहोचवले जात होते. त्यानंतर हा पेपर गरजू किंवा अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जायचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडून 80 हजार ते 1 लाख रुपये उकळले जायचे. सोबतच सुरक्षा म्हणून त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रं आणि गुणपत्रिकाही जमा करून घेतल्या जात असत.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 16 ते 18 जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ता आणि सोलापूरचा प्रकाश पवार यांच्यासह बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील संशयितांचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला आता जलदगती म्हणजेच फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार असून, पुढील तीन महिन्यांत तो निकाली काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या खटल्यासाठी अॅड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ