टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात क्रिप्टो वॉलेट आणि परदेशी फंडिंगचा वापर, बिश्नोई गँगचे कनेक्शन तपासात उघड
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात खंडणीच्या पैशांचा वापर, क्रिप्टो वॉलेटमधून 47 लाख रुपयांचे ट्रान्सफर आणि परदेशी व्हिएपीएन सर्व्हर समोर आले आहेत.
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबाराच्या कटाचा तपास सुरू असताना मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे. हा हल्ला घडवून आणण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने खंडणीच्या पैशांचा वापर केला, तसेच त्यासाठी क्रिप्टो वॉलेट आणि परदेशी फंडिंग झाले, असे तपासात समोर आले आहे.
क्राईम ब्रांचच्या तपासानुसार, बिश्नोई गँगने आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी एका विशेष क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा वापर केला होता. या कटाचा मुख्य सूत्रधार अनिल पंडित याचा भाऊ अभिषेक पंडित याने या क्रिप्टो वॉलेटच्या माध्यमातून त्याची पत्नी सुनेहा पंडित हिच्या बँक खात्यात तब्बल 47 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. हा व्यवहार ऑगस्ट 2022 ते जुलै 2024 या कालावधीत झाल्याचेही क्राईम ब्रांचच्या तपासात उघड झाले आहे.
आणखी धक्कादायक बाब म्हणजे, तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी आणि पैशांचे मूळ ठिकाण लपवण्यासाठी आरोपींनी कंबोडिया आणि डेन्मार्क येथील व्हिएपीएन सर्व्हरचा वापर केला होता.
करनाल येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खात्यात हे पैसे आल्यानंतर सुनेहा पंडित हिने ते गोळीबार प्रकरणातील इतर आरोपींच्या खात्यांमध्ये वर्ग केले. या पैशांचा वापर बाईकची खरेदी, हॉटेलचा खर्च आणि इतर खर्चांसाठी करण्यात आला.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल खरेदी करण्यासाठी आरोपी ऋतिक याच्या खात्यात सप्टेंबर 2026 मध्ये 27,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. तसेच ऋतिकच्या खात्यात पाठवलेल्या एकूण 57,000 रुपयांपैकी 30,000 रुपये गोळीबाराच्या घटनेच्या अवघ्या 18 तास आधी पाठवण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर शूटर फूल सिंह आणि रेहान यांच्या लॉजच्या खात्यावर 5000 रुपये, तर आरोपी अमर याच्या खात्यात 50,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.
करनाल येथील एसबीआयचे हे खाते अभिषेक पंडित याच्या नावावर होते, मात्र त्या खात्याला त्याची पत्नी सुनेहा हिचा मोबाईल नंबर लिंक होता. क्राईम ब्रांचने सुनेहा हिच्याकडून हा मोबाईल जप्त केला आहे.
सुनेहा हिला या संपूर्ण कटाची आधीपासून कल्पना होती आणि ती पतीच्या सांगण्यावरून आरोपींना पैसे ट्रान्सफर करत होती, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास क्राईम ब्रांच करत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.