मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

तळवडेत बंगल्यात ५३.७० लाखांची चोरी; चिखली पोलिसांनी तिघा आरोपींना केली अटक

तळवडेत बंगल्यात ५३.७० लाखांची चोरी; चिखली पोलिसांनी तिघा आरोपींना केली अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

कुदळवाडीतील भंगार गोदामात चोरीसाठी निघालेल्या तिघांनी तळवडेतील बंगला फोडल्याचा आरोप आहे. ७० हून अधिक सीसीटीव्ही तपासून चिखली पोलिसांनी त्यांना अटक केली.

पिंपरी : तळवडे येथील एका बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कुदळवाडीतील भंगार गोदामात चोरी करायला निघालेल्या या तिघांनी तळवडेतील बंगल्याची माहिती मिळताच आपला बेत बदलला, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बंगल्यात घुसून ६८ तोळे सोन्याचे दागिने, पाच लाखांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू, असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अनारुल्ला मजहर उल्ला चौधरी (वय ३६, रा. चिखली), अब्दुल रहिम मजिद मोमीन (वय ३९, रा. कांदिवली, मुंबई) आणि समिउल्ला अजमतउल्ला खान (वय ३२, रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अनारुल्ला चौधरी चहाच्या टपरीवर काम करत होता. कौटुंबिक वादातून त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्याने अब्दुल आणि समिउल्ला यांना पिंपरी-चिंचवडमध्ये बोलावून घेतले. तिघांनी मिळून कुदळवाडीतील एका भंगार गोदामात चोरी करायचे ठरवले आणि त्या गोदामाच्या शोधात ते निघाले.

तळवडे येथे भारती भालेकर यांच्या जागेत असलेल्या एका हॉटेलमध्ये ते चहा प्यायला थांबले. तिथे त्यांनी हॉटेलचालकाकडे जागेच्या मालकीची चौकशी केली. ही जागा भालेकर यांची असून आपण भाड्याने हॉटेल चालवतो, असे हॉटेलचालकाने सांगितले. त्यानंतर आरोपींनी हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या भालेकर यांच्या बंगल्याची पाहणी केली. या परिसरात तो एकच बंगला असून तिथल्या बहुतांश खोल्या भाड्याने दिल्या आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. मग भंगार गोदामाऐवजी बंगल्यातच चोरी करण्याचा बेत त्यांनी आखला. बंगल्याच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून आत जाण्याचा मार्ग शोधून त्यांनी योजना पक्की केली.

१३ ऑक्टोबर रोजी पहाटे एकच्या सुमारास आरोपींनी बांधकाम सुरू असलेल्या जागेतून बंगल्याच्या टेरेसवर प्रवेश केला. तिथून ते पहिल्या मजल्यावरील खोलीत गेले आणि झोपलेल्या भारती भालेकर यांचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन त्यांनी पळ काढला. चोरीला गेलेल्या ऐवजात ४८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिने, पाच लाख रुपये रोख, ३० हजार रुपयांचे चांदीचे दागिने, १० हजार रुपयांचा मोबाइल आणि पाच हजार रुपयांचे घड्याळ यांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत ५३ लाख ७० हजार रुपये आहे.

चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिखलीचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यावर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार आधी अनारुल्ला चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन साथीदारांसह चोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अब्दुल मोमीन आणि समिउल्ला खान यांनाही अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून ७३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, एक दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार, असा एकूण ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या चोरीत सुमारे १०० तोळे सोने नेल्याची चर्चा परिसरात होती. फिर्यादीत केवळ ६९ तोळे सोन्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचीही चर्चा होती. मात्र पोलिसांनी फिर्यादीत नमूद केलेल्या सोन्यापेक्षा जास्त, म्हणजे ७३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केल्यामुळे या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. चोरीला गेलेल्या सोन्याचे नेमके प्रमाण आणि जप्त केलेल्या दागिन्यांचा तपशील याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ