शुक्राणू चांगले असूनही गर्भधारणा होत नाहीये? ताठरता आणि वीर्यस्खलनाच्या अडचणी कारण ठरू शकतात
नागपूरमधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रमोद येरणे यांच्या मते, लैंगिक कार्य आणि प्रजनन क्षमता या स्वतंत्र बाबी आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेची तपासणी करताना शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गुणवत्ता हे महत्त्वाचे मुद्दे धरले जातात. पण एवढ्यावरच भागत नाही. शरीरसंबंधाच्या वेळी शुक्राणू स्त्रीच्या पुनरुत्पादन मार्गापर्यंत पोहोचवण्याची क्षमताही जोडप्याच्या नैसर्गिक गर्भधारणेच्या संधींवर परिणाम करू शकते.
बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, नागपूर येथील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रमोद येरणे यांच्या मते, लैंगिक कार्य आणि प्रजनन क्षमता या पुनरुत्पादक आरोग्याशी जोडलेल्या असल्या तरी त्या स्वतंत्र बाबी आहेत. एखाद्या पुरुषाचे शुक्राणू उत्पादन सामान्य असूनही त्याला ताठरता मिळवण्यात अडचण येऊ शकते. तसेच संबंध ठेवताना कोणतीही अडचण नसलेल्या पुरुषाचा सीमेन अॅनालिसिसचा अहवाल असामान्य असू शकतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांची तपासणी करताना हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात.
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे शारीरिक संबंधांसाठी पुरेशी ताठरता मिळवण्यात किंवा ती टिकवून ठेवण्यात सातत्याने येणारी असमर्थता. यामुळे संबंध ठेवण्यात अडथळा आला, तर नैसर्गिक गर्भधारणेच्या संधी कमी होऊ शकतात, असे डॉ. येरणे यांचे म्हणणे आहे. वीर्यस्खलनाशी संबंधित विकार वेगवेगळ्या प्रकारे प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात.
वीर्यस्खलनास उशीर होणे किंवा स्खलन न होणे यामुळे वीर्य योनीमार्गात सोडले जाण्यास अडथळा येऊ शकतो. काही पुरुषांमध्ये रेट्रोग्रेड इजॅक्युलेशनची समस्या असते. त्यात वीर्य लिंगातून बाहेर पडण्याऐवजी मागे मूत्राशयात जाते. त्यामुळे शुक्राणू स्त्रीच्या पुनरुत्पादन मार्गापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि नैसर्गिक गर्भधारणा कठीण होते.
या अडचणी कशामुळे होतात, याबद्दलही डॉ. येरणे यांनी माहिती दिली. त्यांच्या मते, ताठरता आणि वीर्यस्खलनातील समस्या अनेक वैद्यकीय तसेच मानसिक कारणांमुळे उद्भवू शकतात. मधुमेह, हार्मोनल असंतुलन, मज्जासंस्थेशी संबंधित विकार, रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या समस्या आणि काही विशिष्ट औषधे सामान्य लैंगिक कार्यात अडथळा आणू शकतात.
उदाहरण म्हणून, नियंत्रणात नसलेल्या मधुमेहामुळे ताठरता आणि स्खलनाशी संबंधित मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. स्त्रीबीज निर्मितीच्या (ओव्ह्युलेशन) कालावधीनुसार शारीरिक संबंधांचे नियोजन केले जाते, तेव्हा येणारा मानसिक ताण आणि परफॉर्मन्स अँझायटी (कामगिरीची चिंता) यांचीही त्यात भर पडू शकते. पण सातत्याने जाणवणाऱ्या या अडचणी केवळ मानसिक कारणांमुळे आहेत, असे गृहीत धरू नये. कारण यामागे एखादा सुप्त वैद्यकीय आजार असू शकतो आणि त्याकडे लक्ष द्यावे लागू शकते, असे ते म्हणतात.
तपासणीची सुरुवात सविस्तर वैद्यकीय आणि लैंगिक पार्श्वभूमी जाणून घेण्यापासून होते. समस्या कशा स्वरूपाची आहे आणि किती काळापासून आहे, हे त्यातून समजते. त्यानुसार डॉक्टर शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि आकार तपासण्यासाठी सीमेन अॅनालिसिसचा सल्ला देऊ शकतात. उपचार समस्येच्या मूळ कारणावर अवलंबून असतात. त्यात औषधोपचार, संबंधित आजारांचे नियंत्रण किंवा स्खलनाच्या विकारांवरील विशिष्ट वैद्यकीय उपाय यांचा समावेश असू शकतो.
या उपायांनंतरही नैसर्गिक गर्भधारणा झाली नाही, तर शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेचे इतर घटक पाहून सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानाचा (एआरटी) विचार केला जाऊ शकतो, असे डॉ. येरणे यांच्या मतातून समजते. त्यात गर्भाशयात वीर्य सोडणे (आययूआय) किंवा इंट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शनसह (आयसीएसआय) आयव्हीएफ यांचा समावेश आहे. निवडक केसेसमध्ये शुक्राणू मिळवण्यासाठी विशेष प्रक्रियांची (स्पर्म रिट्रिव्हल) गरज भासू शकते.
गर्भधारणेचा प्रयत्न करताना सातत्याने ताठरता किंवा वीर्यस्खलनात अडचण येत असेल, तर जोडप्यांनी तपासणीस उशीर न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे डॉ. येरणे सांगतात. समस्येचे मूळ कामजीवनात आहे, शुक्राणूंच्या गुणवत्तेत आहे की दोन्हींमध्ये, हे निश्चित झाल्यास योग्य उपचार पद्धत ठरवण्यास आणि गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यास मदत होऊ शकते, असेही ते म्हणतात.