वारंवार अंगावर पित्त उठतंय? प्रत्येक वेळी अॅलर्जी नसते, असं ठाण्यातील डॉक्टर सांगतात
ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट डर्माटोलॉजिस्ट डॉ. विशालाक्षी विश्वनाथ यांनी क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया (सीएसयू) या आजाराबद्दल माहिती दिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अंगावर पित्त उठलं की त्याचं कारण शोधायला आपण सगळेच लागतो. काहीतरी खाण्यात आलं असेल, एखादं औषध घेतलं असेल किंवा त्वचेला लावलेल्या एखाद्या उत्पादनामुळे झालं असेल, असा संशय येतो. पण कोणतंही स्पष्ट कारण किंवा ट्रिगर नसताना पित्त वारंवार उठत राहिलं तर काय, याबद्दल ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट डर्माटोलॉजिस्ट डॉ. विशालाक्षी विश्वनाथ यांनी क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया या आजाराची माहिती दिली आहे.
डॉ. विश्वनाथ यांच्या माहितीनुसार, क्रॉनिक अर्टिकारियामध्ये सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंगावर सतत पित्त उठतं, सूज येते किंवा दोन्ही त्रास वारंवार होतात. त्याचाच एक प्रकार म्हणजे क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया, म्हणजेच सीएसयू. यात कोणतंही बाह्य कारण किंवा ट्रिगर नसतानाही लक्षणं अचानक दिसू लागतात. एखाद्या विशिष्ट घटकामुळे होणाऱ्या अॅलर्जीच्या प्रतिक्रियेपेक्षा हे वेगळं असतं. हा फरक वेळेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे योग्य उपचार आणि लक्षणांचं प्रभावी व्यवस्थापन करायला मदत होते, असं त्या सांगतात.
डॉ. विश्वनाथ म्हणाल्या, "अंगावर वारंवार पित्त उठणं हे प्रत्येक वेळी अॅलर्जीचं लक्षण असेल असं नाही. कोणतंही स्पष्ट कारण नसताना लक्षणं सतत दिसत राहतात किंवा पुन्हा पुन्हा येतात, तेव्हा त्यामागे क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया हे संभाव्य कारण असू शकतं. डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेतल्यास या लक्षणांमागचं नेमकं कारण शोधणं आणि योग्य उपचारांची दिशा ठरवणं शक्य होतं. विशेषतः वारंवार उठणारं पित्त झोपेत अडथळा आणू लागतं, अस्वस्थता वाढवतं किंवा रोजच्या जीवनावर परिणाम करू लागतं, तेव्हा वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत गरजेचं ठरतं."
डॉ. विश्वनाथ यांनी पाच मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा असा की, पित्त उठणं म्हणजे त्वचेवर अचानक लालसर, खाज येणारे चट्टे तयार होणं, जे शरीराच्या कोणत्याही भागावर दिसू शकतात. ते अॅलर्जीच्या प्रतिक्रियेमुळे होऊ शकतात, पण सीएसयूचंही ते प्रमुख लक्षण आहे, ज्यात कोणतंही बाह्य कारण नसतानाही त्रास होतो. त्यामुळे वारंवार पित्त उठलं तर ते फक्त एखाद्या अन्नपदार्थामुळे, उत्पादनामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे होत आहे असं मानू नये, असं त्या म्हणतात. लक्षणांचं स्वरूप आणि रुग्णाचा वैद्यकीय इतिहास पाहून आरोग्य तज्ज्ञ नेमकी समस्या काय आहे याचं मूल्यांकन करू शकतात.
दुसरा मुद्दा सहा आठवड्यांच्या कालावधीचा आहे. पित्ताचा त्रास सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत होत असेल, तर त्या स्थितीला क्रॉनिक अर्टिकारिया मानलं जातं. सीएसयूमध्ये त्वचेवरचे चट्टे सहसा २४ तासांच्या आत नाहीसे होतात, पण शरीराच्या दुसऱ्या भागावर नवीन चट्टे उमटू शकतात. दोन त्रासांच्या मधल्या काळात त्वचा अगदी सामान्य दिसली, तरी आजार शरीरात सुरू राहू शकतो. पित्त कधी उठतं, किती वेळ टिकतं आणि सोबत सूज येते का, याची नियमित नोंद ठेवली तर डॉक्टरांकडे गेल्यावर ती माहिती निदानासाठी उपयुक्त ठरते, असं डॉ. विश्वनाथ सांगतात.
तिसरा मुद्दा कारणांच्या शोधाचा आहे. लक्षणं पुन्हा पुन्हा येतात, तेव्हा त्रास परत होऊ नये म्हणून काही जण आहारात बदल करतात, स्किनकेअर उत्पादनं बदलतात किंवा रोजच्या सवयी टाळू लागतात. पण सीएसयूच्या बाबतीत शोधता येईल किंवा टाळता येईल असा ठरावीक बाह्य घटक किंवा ट्रिगर नसतो. काही गोष्टींमुळे काही जणांमध्ये लक्षणं जास्त तीव्र होत असली, तरी त्या गोष्टी समस्येचं मूळ कारण आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. पुढच्या चाचण्यांची गरज आहे का हे डर्माटोलॉजिस्ट पाहू शकतात आणि रुग्णांना अनावश्यक निर्बंध टाळायला मदत करू शकतात.
चौथा मुद्दा असा की, सीएसयूचा परिणाम फक्त त्वचेपुरता मर्यादित नसतो. सतत खाज येत राहिल्यामुळे झोपमोड होऊ शकते, दिवसा थकवा जाणवू शकतो आणि कामावर लक्ष लावणं किंवा रोजची कामं सांभाळणं अवघड होऊ शकतं. अंगावर स्पष्ट दिसणारे चट्टे किंवा सूज यामुळे इतरांमध्ये वावरताना अस्वस्थता किंवा न्यूनगंड वाटू शकतो. लक्षणं पुन्हा कधी येतील याची अनिश्चितता मानसिक ताण वाढवू शकते. सीएसयू त्वचेच्या बाह्य रूपावरच नाही, तर जीवनशैलीच्या दर्जावर आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करू शकतो.
पाचवा मुद्दा अचूक निदानाचा आहे. वारंवार पित्त उठण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात, म्हणून योग्य उपचारांसाठी नेमकी समस्या ओळखणं ही महत्त्वाची पायरी आहे. डर्माटोलॉजिस्ट किंवा अॅलर्जिस्ट लक्षणांचा कालावधी आणि स्वरूप तपासून, वैद्यकीय इतिहास पाहून पुढच्या चाचण्यांची गरज ठरवू शकतात. सीएसयूवरचे उपचार प्रामुख्याने लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यावर केंद्रित असतात आणि ते वैद्यकीय मूल्यमापनावर व उपचारांना शरीर देत असलेल्या प्रतिसादावर अवलंबून असतात. कोणतीही स्पष्ट अॅलर्जी कारणीभूत नसते, तेव्हा संशयित घटक वारंवार टाळून लक्षणं पूर्णपणे थांबत नाहीत.
थोडक्यात, अंगावर वारंवार उठणाऱ्या पित्ताकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, विशेषतः जेव्हा ही समस्या कित्येक आठवडे टिकते किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना पुन्हा पुन्हा येते, असं डॉ. विश्वनाथ यांच्या माहितीतून समोर येतं. प्रत्येक वेळचा त्रास फक्त अॅलर्जीमुळे आहे असं गृहीत धरण्याऐवजी लक्षणांचं स्वरूप समजून घेऊन डर्माटोलॉजिस्टकडून योग्य तपासणी करून घेतली, तर रुग्णांना लक्षणांचं अधिक प्रभावी व्यवस्थापन करायला मदत होऊ शकते.