सातारच्या ११ वर्षांच्या राघवने दोन दिवसांत सर केले कलावंतीण आणि प्रबळगड
राघव किरण मोरे या अकरा वर्षांच्या मुलाने कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड या दोन्ही दुर्गशिखरांवर दोन दिवसांच्या मोहिमेत यशस्वी चढाई केली.
जिद्द, चिकाटी आणि गिर्यारोहणाची आवड असली की वय आड येत नाही, हे सातारच्या राघव किरण मोरे याने दाखवून दिले आहे. राघव अवघ्या ११ वर्षांचा आहे. सह्याद्रीतला अवघड मानला जाणारा कलावंतीण दुर्ग आणि ऐतिहासिक प्रबळगड ही दोन्ही शिखरे त्याने दोन दिवसांच्या मोहिमेत सर केली. त्याच्या या कामगिरीचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.
मोहिमेची सुरुवात शुक्रवारी दुपारी १२ वाजता पायथ्यापासून झाली. दुपारी २.३० वाजता राघव आणि त्याचे सहकारी प्रबळमाचीवर पोहोचले. तिथे जेवण झाल्यावर पुढची चढाई सुरू झाली. साधारण अर्धा तास चढल्यानंतर कलावंतीण दुर्गाच्या खड्या आणि आव्हानात्मक पायऱ्या सुरू झाल्या. या अवघड पायऱ्या राघवने फक्त २० मिनिटांत पार केल्या आणि कलावंतीणीचे शिखर गाठले. रात्री साडेसातच्या सुमारास सगळे सुरक्षितपणे खाली उतरले.
दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी ६.३० वाजता प्रबळगडाची चढाई सुरू झाली. दोन तासांत, म्हणजे सकाळी ८.३० वाजता, राघव प्रबळगडाच्या माथ्यावर पोहोचला. खड्या चढणी, अवघड पायऱ्या आणि रात्रीची उतराई अशा अनेक अडचणी या दोन दिवसांत आल्या. तरीही राघवचा आत्मविश्वास आणि धैर्य टिकून राहिले.
या मोहिमेसाठी दुर्गनाद ट्रेकर्सचे संस्थापक गणेश शिंदे आणि दुर्गनाद ट्रेकर्सच्या कोल्हापूर व सातारा टीमचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. राघवच्या पालकांनीही त्याच्या शारीरिक तयारीकडे तसेच मोहिमेच्या सुरक्षिततेकडे नीट लक्ष दिले.
कलावंतीण दुर्गाचे दोन भाग आहेत, प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका. प्रबळ माचीवर आदिवासी बांधवांची वस्ती आहे. तिथली वाट रुंद आणि घसरणीची आहे. पुढे दगडात कोरलेल्या पायऱ्या ८० अंशाच्या कोनात थेट माथ्याला भिडतात. या पायऱ्या एक ते दीड फूट उंच आहेत. सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा आहे आणि तिचे प्रवेशद्वार लहान आहे.
पायऱ्यांचा शेवटचा टप्पा संपल्यावर कलावंतीणीचा शेवटचा २५ फुटांचा रॉकपॅच, म्हणजे पिनॅकलचा भाग येतो. हा काळ्या कातळाचा रॉकपॅच आजूबाजूचे अनेक दुर्ग आणि खालच्या प्रदेशावर नजर ठेवणारा नैसर्गिक बुरुजच म्हणता येईल. या रॉकपॅचवर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो.
राघव आण्णासाहेब कल्याणी शाळेत शिकतो आणि सध्या सहावीत आहे. लहान वयातच गड, किल्ले आणि निसर्गाची आवड जोपासणाऱ्या राघवने ११ व्या वर्षी कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड सर करून बाल गिर्यारोहकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. प्राथमिक माहितीनुसार सह्याद्रीतला हा अवघड गड चढणारा तो पहिला लहान मुलगा आहे. त्याच्या या मोहिमेमुळे मुलांमध्ये गड, किल्ल्यांबद्दल प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.