"भारतात शांतता जाणवत नाही" या विधानावर संजय दत्तचं स्पष्टीकरण, म्हणाला स्क्रिप्टचा भाग होतं
'शेखर टुनाइट' कार्यक्रमातल्या विधानावरून सोशल मीडियावर वाद झाल्यानंतर संजय दत्तने निवेदन शेअर करून आपली भूमिका मांडली आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने 'शेखर टुनाइट' या कार्यक्रमात केलेल्या एका विधानावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि वादही उभा राहिला. त्या कार्यक्रमात त्याने "मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही" असं म्हटलं होतं. आता त्याने या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक निवेदन शेअर करून आपली बाजू मांडली. कार्यक्रमात तो जे काही बोलला, ते आधीच ठरलेलं होतं आणि स्क्रिप्टचा भाग होतं, असं त्याने सांगितलं. कोणत्याही व्यक्तीच्या, समुदायाच्या किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा किंवा अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता, असंही त्याने स्पष्ट केलं.
त्या संभाषणातून हलकंफुलकं आणि विनोदी वातावरण तयार करणं एवढाच उद्देश होता, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याचे शब्द संदर्भाबाहेर घेतले गेले.
विधानामागची भावना 'मुन्नाभाई'सारख्या चित्रपटांमधल्या विनोद आणि उपहासाच्या शैलीशी जोडलेली होती, असं संजय दत्तने पुढे सांगितलं. विशेषतः 'गांधीगिरी'च्या कल्पनेतून प्रेम, आपलेपणा, एकता आणि सदिच्छा यांचा संदेश द्यायचा होता, असं त्याने स्पष्ट केलं.
कार्यक्रमात संजय दत्तला आपण देशाचे पंतप्रधान आहोत अशी कल्पना करायला सांगण्यात आलं होतं आणि त्या भूमिकेतून काही मिनिटं लोकांशी बोलायचं होतं. त्यावेळी त्याने 'मुन्नाभाई'च्या शैलीत उपहासात्मक भाषण केलं होतं.
त्या भाषणात संजय दत्तने भारतातलं प्रेम, शांतता आणि पाहुणचार यांचा उल्लेख केला होता. "मला आता माझ्या देशात तीच शांतता जाणवत नाही," असं तो म्हणाला होता. पूर्वीचे दिवस पुन्हा यावेत, अशी प्रार्थना करत असल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र या विधानाचा वेगळा अर्थ घेतला गेला, असं त्याने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
याआधी त्याच्या आणखी एका विधानाचीही अलीकडे चर्चा झाली होती. एका कार्यक्रमात त्याला मराठीत बोलायला सांगण्यात आलं होतं आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला होता. त्यावर संजय दत्तने मिश्कीलपणे म्हटलं होतं की, आपण येरवडा तुरुंगात सहा वर्षं घालवली, तरीही मराठी शिकलो नाही.
त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी त्याच्या उत्तराचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर टीका केली. आता 'भारतात शांतता नाही' या विधानावर त्याने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.