समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
इंग्लंडमधील एका तरुणाने प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी चक्क शार्क टँकची निवड केली, हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक सहसा कँडल लाईट डिनर, गार्डन किंवा आधीच बुक केलेल्या हॉटेलची निवड करतात. रोमँटिक क्षण साजरा करण्याचे हे नेहमीचे आणि ओळखीचे मार्ग असतात. पण इंग्लंडमधील एका तरुणाने यासाठी चक्क समुद्राचा तळ निवडला आणि नेहमीच्या पद्धतींपेक्षा पूर्णपणे वेगळी वाट निवडली. या अनोख्या प्रपोजलचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यूजर्सकडून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
इंग्लंडमधील बकिंगहॅमशायर येथे राहणाऱ्या जेम्स वॉल्श याने त्याची प्रेयसी पेज कुक हिला लग्नाची मागणी घालण्यासाठी जगातील सर्वात वेगळ्या ठिकाणांपैकी एका ठिकाणाची निवड केली. रोजच्या ओळखीच्या जागांऐवजी त्याने चक्क पाण्याखालची, माशांच्या सानिध्यातली जागा निवडली. यासाठी त्याने लिंकनशायरमधील स्केगनेस ॲक्वेरिअममधील शार्क टँकची निवड केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रपोजल १० सप्टेंबर रोजी करण्यात आले. जेम्सने याआधीच ॲक्वेरिअममधील कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना दिली होती, म्हणजे हा संपूर्ण क्षण नीट कॅमेऱ्यात टिपता यावा यासाठी आधीच सगळी तयारी केली होती.
वेटसूट आणि स्कूबा गियर घालून दोघेही पाण्यात पोहत असताना जेम्सने हातात WILL YOU MARRY ME असे लिहिलेला बोर्ड घेतला आणि माशांच्या सानिध्यात पेजला लग्नाची मागणी घातली. पाण्याखाली, माशांच्या गर्दीत उभा राहून हातातला बोर्ड दाखवणे हाच त्याचा प्रपोजलचा अनोखा मार्ग होता. हे पाहून पेज कुक खूप खुश झाली आणि तिने लगेच होकार दिला. होकार मिळताच दोघांनी पाण्याखाली एकमेकांना मिठी मारली, आणि हा क्षण आणखीनच खास बनला.
हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून @Skegness Aquarium या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. ॲक्वेरिअमच्याच अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे तो लगेच लोकांच्या नजरेत आला. व्हिडिओ शेअर होताच तो झपाट्याने व्हायरल झाला आणि यूजर्सनी जेम्सच्या या अनोख्या कल्पनेचे भरभरून कौतुक केले.
व्हिडिओवर अनेक यूजर्सनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. एका यूजरने लिहिले, "व्वा, म्हणजे त्याने फिश टँकमध्ये जाऊन प्रपोज केलं". दुसऱ्या एका यूजरने गमतीत लिहिले, "मासेही म्हणत असेल देवा हे काय काय बघावं लागतंय". तर आणखी एका यूजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, "हे जरा जास्तच अनोखं प्रपोजल होतं". या कमेंट्समधूनच व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद किती मोठा होता हे दिसून येते.
पाण्याखाली, माशांच्या सानिध्यात आणि एका मोठ्या शार्क टँकमध्ये केलेले हे प्रपोजल सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर केला जात असून प्रेम व्यक्त करण्याच्या या हटके पद्धतीचे कौतुक होत आहे.