साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका फरक काय? त्वचेच्या प्रकारानुसार योग्य पर्याय निवडा
आंघोळीसाठी साबण की बॉडी वॉश, असा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्हींमधला फरक आणि त्वचेच्या प्रकारानुसार निवड कशी करायची, ते जाणून घ्या.
आंघोळीसाठी अनेक जण अजूनही साबण वापरतात. पण आता बॉडी वॉश वापरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे मग दोघांत नेमका फरक काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण दोन्हीचा वापर शरीरावरचा मळ स्वच्छ करण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठीच केला जातो.
मुख्य फरक असा की साबण घन स्वरूपात असतो आणि त्वचेची खोलवर स्वच्छता करतो. बॉडी वॉश मात्र द्रव क्लीन्झर आहे. तो त्वचा स्वच्छ करतो आणि त्यासोबतच जास्त ओलावा देतो. या ओलाव्यालाच हायड्रेशन आणि आर्द्रता म्हणतात.
दोघांची बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. पारंपरिक साबण तेल किंवा चरबी अल्कलीसोबत एकत्र करून सॅपोनिफिकेशनद्वारे बनवला जातो. याउलट बहुतेक बॉडी वॉश पाण्यावर आधारित असतात. त्यात कृत्रिम डिटर्जंट आणि फेस तयार करणारे घटक असतात.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्वचेवर काय परिणाम होतो. साबण त्वचेतले नैसर्गिक तेल आणि खोलवर साचलेली घाण लवकर काढून टाकतो. त्यामुळे कधी कधी त्वचा कोरडी वाटू शकते. बॉडी वॉशमध्ये मात्र अतिरिक्त मॉइश्चरायझिंग घटक असतात. हे घटक कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर असतात.
वापरण्याची पद्धतही वेगळी आहे. साबण थेट त्वचेवर चोळून वापरला जातो. बॉडी वॉश सामान्यतः लूफा किंवा स्पंजने लावला जातो, आणि त्यामुळे जास्त फेस तयार होतो.
टिकाऊपणा आणि पर्यावरणाचा विचार केला, तर साबण अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असतात. बॉडी वॉश मात्र प्रवासासाठी आणि स्वच्छतेसाठी सोयीचे मानले जातात.
म्हणजेच खरं तर दोन्हींचा वापर आपापल्या जागी योग्यच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार पाहून आणि त्यानुसार योग्य पर्याय निवडणं हेच सोयीचं ठरतं.