पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला अपेक्षित यश नाही, हर्षदा देशमुख-जाधव विजयी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सत्ता, संघटन आणि प्रभावशाली घराण्याचा पाठिंबा असूनही पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला हवे ते यश मिळाले नाही. ऐनवेळी पक्षात घेतलेल्या स्मिता जाधव यांच्यावरचा डाव फसला.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. सत्ता, संघटन, प्रभावशाली राजकीय घराण्याचा पाठिंबा आणि विजयासाठी पणाला लावलेली ताकद, इतके सगळे असूनही निकाल पक्षाच्या बाजूने लागला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला.
२०२० मध्ये हा मतदारसंघ भाजपच्या हातून गेला होता. तो पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. कोल्हापुरातील प्रभावशाली जाधव घराण्यातील स्मिता जाधव यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. मात्र, या धक्कातंत्राचा अपेक्षित परिणाम झाला नाही.
या निकालामुळे उमेदवार निवडीचे राजकारण, अंतर्गत नाराजी आणि संघटनात्मक ताकद यांची चर्चा एकाच वेळी सुरू झाली आहे. प्रभावशाली आडनाव आणि सत्तेची ताकद असूनही भाजपचे गणित कुठे चुकले, हा या निकालातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपला विरोधकांनी हरवले की स्वतःच्या रणनीतीतील त्रुटींमुळे पराभवाचा मार्ग मोकळा झाला, याचे उत्तरच आगामी निवडणुकांसाठी पक्षाची दिशा ठरवणार आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत हा मतदारसंघ पसरलेला आहे. यात ४७ उमेदवार रिंगणात होते, पण मुख्य लढत स्मिता जाधव आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्यातच झाली. विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड आणि अजित पवार गटाचे नेते भैय्या माने उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. अखेर संधी स्मिता जाधव यांना मिळाल्याने स्थानिक इच्छुकांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली का, हा प्रश्न उपस्थित झाला.
भैय्या माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता, पण नंतर त्यांनी माघार घेतली. अशा वेळी इच्छुकांच्या समर्थकांनी प्रचारात किती सक्रिय सहभाग घेतला, याचे उत्तर भाजपच्या आत्मपरीक्षणातूनच मिळू शकते.
स्मिता जाधव यांचे काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी नातेसंबंध आहेत, त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरणांचा फायदा होईल, अशी अपेक्षा होती. पण काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत हर्षदा देशमुख जाधव यांच्या समर्थनाची भूमिका घेतली. म्हणजे वैयक्तिक संबंधांपेक्षा राजकीय बांधिलकी वरचढ ठरल्याचे चित्र दिसले. बाहेरून आलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिल्यामुळे भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
हर्षदा देशमुख-जाधव यांना शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि महाविकास आघाडीच्या समन्वयाचा फायदा झाला. प्रभाकर देशमुख यांच्या कन्या म्हणून पुणे, सातारा आणि सांगली परिसरात असलेले त्यांचे संपर्कही महत्त्वाचे ठरले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील मोदी रिंगणात असूनही मतविभाजनाचा भाजपला अपेक्षित फायदा झाला नाही.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.