स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयमध्ये करार; चाकणजवळ क्रॅश टेस्ट सुविधा उभारणार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया आणि एआरएआय यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून, चाकण (पुणे) येथे भविष्यातील मोबिलिटी वाहनांसाठी अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सुविधा उभारली जाणार आहे.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांनी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. चाकण (पुणे) येथे वाहन सुरक्षा आणि चाचणीसाठीच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, हा या कराराचा उद्देश आहे.
करारानुसार एसएव्हीडब्ल्यूआयपीएल आपल्या चाकण प्रकल्पाजवळचा एक भूखंड एआरएआयकडे हस्तांतरित करणार आहे. त्या जागेवर भविष्यातील मोबिलिटी वाहनांसाठी अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सुविधा उभारली जाईल.
हा सामंजस्य करार पार पडला तेव्हा केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी, एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पीयूष अरोरा आणि एआरएआयचे डायरेक्टर डॉ. रेजी मथाई उपस्थित होते. ही नवीन सुविधा इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्या, सुरक्षा मानके आणि भारत एनसीएपी (NCAP) मूल्यांकनांना अधिक गती देईल. या प्रकल्पामुळे भारतातील वाहन संशोधन, स्थानिक अभियांत्रिकी आणि सुरक्षित कार विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
या प्रसंगी तिघांनीही कराराबद्दल आपले मत मांडले. केंद्रीय मंत्री कुमारस्वामी म्हणाले, "भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्र वेगाने पुढे जात असताना स्थानिक आरअँडडी आणि सुरक्षा चाचणी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. चाकणमध्ये ही सुविधा उभारून आम्ही भविष्यातील भारत एनसीएपीच्या गरजांची जलद अंमलबजावणी करण्यास मदत करत आहोत. यामुळे भारताच्या रस्ते सुरक्षा आव्हानांवर मात करण्यासोबतच जागतिक बाजारपेठेतील कठोर गरजा पूर्ण करणारी वाहने विकसित करण्यास मदत होईल."
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पीयूष अरोरा म्हणाले, "वाहन सुरक्षा आणि स्थानिक अभियांत्रिकी क्षमता आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे. एआरएआयला आमच्या चाकण प्रकल्पाशेजारी क्रॅश टेस्ट सुविधेसाठी जमिनीची आवश्यकता भासली, तेव्हा आम्ही आमच्या भविष्यातील विस्तार आराखड्यात आवश्यक बदल केले. आमच्या 'इंडिया २.०' वाहनांना ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. हा धोरणात्मक सहयोग भारतातील अधिक सुरक्षित वाहनांच्या विकासाला आणि ईव्ही तंत्रज्ञानाला गती देईल."
एआरएआयचे डायरेक्टर डॉ. रेजी मथाई यांनी या कराराचे वर्णन करताना म्हटले, "हा सामंजस्य करार भारताच्या ऑटोमोटिव्ह चाचणी आणि सुरक्षा पायाभूत सुविधांमधील एक धोरणात्मक मैलाचा दगड आहे. वाहनांचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना प्रगत व्हॅलिडेशन आणि क्रॅश टेस्ट क्षमतांची गरज सातत्याने वाढत राहील. आगामी अनेक दशके मोबिलिटी क्षेत्राला उपयुक्त ठरेल अशी जागतिक दर्जाची यंत्रणा उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे."
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.