सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पोमणमध्ये नाल्याची जागा महावितरणला भाडेपट्ट्याने दिल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा

पोमणमध्ये नाल्याची जागा महावितरणला भाडेपट्ट्याने दिल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

वसई तालुक्यातील पोमण येथे महावितरणला भाडेपट्ट्याने दिलेल्या जागेत नैसर्गिक पाण्याचा नाला असल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या डोळ्यात धूळ फेकून, नाल्यावर अतिक्रमण करून तीच वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात मारल्याचा आणि शासनाला ४ कोटी ८१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. बनावट खासगी मोजणी नकाशाच्या आधारे ही फसवणूक झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी महावितरणच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेसर्स रॉयल इंडस्ट्रियल हब या कंपनीचे भागीदार पदमशी कल्याणजी गजरा (वय ६०) आणि हरेश रामजी भानुशाली (वय ५०) यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघेही पोमण येथे राहतात. त्यांच्यावर लावलेले आरोप अजून आरोपच आहेत.

पोमण (ता. वसई) येथील सर्व्हे क्रमांक १२६/१/१ मधील एकूण १८५८ चौरस मीटर जागा रॉयल इंडस्ट्रियल हब कंपनीने सन २०१५ मध्ये महावितरणला नवीन वीज वितरण उपकेंद्र उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने दिली होती. या जागेवर महावितरणने ४ कोटी ८१ लाख ४१ हजार ३४० रुपये खर्च करून २० मेगावॅट (२२/२२ केव्ही) क्षमतेचे वीज उपकेंद्र म्हणजेच स्विचिंग स्टेशन उभारले. तिथल्या माहिती फलकावर मात्र संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ८ कोटी ३५ लाख रुपये असा नमूद आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चंदू विजय पाटील यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालय आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून अधिकृत नोंदी मिळवल्या. या नोंदींमधून हे सगळे प्रकरण उघडकीस आले.

भूमी अभिलेख विभागामार्फत झालेल्या अधिकृत शासकीय मोजणीत महावितरणला दिलेल्या एकूण जागेपैकी ६२४.४८ चौरस मीटर क्षेत्र नैसर्गिक पाण्याचा नाला असल्याचे स्पष्ट झाले. आरोपानुसार, गजरा आणि भानुशाली यांनी नाल्यावरचे हे अतिक्रमण आपल्याच मालकीचे असल्याचे भासवले. जागेचा खोटा खासगी मोजणी नकाशा तयार करून त्यांनी ती जागा महावितरण कंपनीला भाडेपट्ट्याने दिली, असा आरोप आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचे कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर झालेल्या चौकशी अहवालातही नमूद आहे.

अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण उद्धवराव सुटे यांनी नायगाव पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गजरा आणि भानुशाली यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित नलवडे पुढील तपास करत आहेत. दोघा भागीदारांवर आता अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणात महावितरणच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ