पुत्रयोगाची पर्ची, चौथ्यांदाही मुलगीच; बागेश्वर धामच्या शास्त्रींना अंनिसचे 1 कोटींचे आव्हान
झांशीच्या एका भक्ताचा दावा - बागेश्वर धामने 'पुत्रयोग' सांगितल्याने त्यांनी 10 वर्षांनी पुन्हा बाळाचे नियोजन केले, पण चौथीही मुलगीच झाली. अंनिसने प्रकरण हाती घेत धीरेंद्र शास्त्रींना 1 कोटींचे आव्हान दिले आहे.
बागेश्वर धामचे प्रमुख आणि प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळचा आरोप आहे तो थेट फसवणुकीचा. उत्तर प्रदेशातील एका भक्ताने आपली फसवणूक झाल्याची तक्रार 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती' म्हणजेच अंनिसकडे नोंदवली आहे.
झांशीतील मगरवाडा भागात राहणारे राजेंद्र कुमार मार्च 2024 पासून बागेश्वर धामला जात होते. मे 2024 मध्ये धीरेंद्र शास्त्रींनी त्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या नावाची एक पर्ची काढली. या पर्चीत लिहिले होते - राजेंद्र कुमार यांच्या पत्नीला प्रेतबाधा असून त्यासाठी 21 पेशी करावी लागेल. हे केल्यानंतर 'पुत्रयोग बनेगा' असा दावा त्यात लेखी नमूद करण्यात आला होता.
या दाव्यावर विश्वास ठेवत राजेंद्र कुमार यांनी 10 वर्षांच्या अंतराने पुन्हा एकदा बाळाचे नियोजन केले. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. आधीच घरात तीन मुली असताना आणि शास्त्रींनी मुलगाच होईल असे ठामपणे सांगितल्यानंतरही चौथ्यांदा मुलगीच झाल्याने आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचे राजेंद्र कुमार यांचे म्हणणे आहे.
आपल्यासोबत जे घडले ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये, या हेतूने राजेंद्र कुमार यांनी अंनिसचे संघटक हरीश देशमुख यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली. यानंतर अंनिसने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली. आपले कथित चमत्कार वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून दाखवावेत, तसे केल्यास 1 कोटी रुपयांचे बक्षीस देऊ, असे थेट आव्हान अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी धीरेंद्र शास्त्रींना दिले आहे. अशा भ्रामक दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही अंनिसने केले आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथील कथावाचक म्हणून ओळखले जातात. हनुमान भक्ती आणि भागवत कथांच्या माध्यमातून त्यांची ओळख तयार झाली असून अनुयायांमध्ये त्यांना 'बागेश्वर धाम महाराज' म्हणूनही ओळखले जाते. जुलै 1996 मध्ये छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कथावाचन आणि पुजारी म्हणून धार्मिक कार्याशी जोडलेले होते. गावातील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती उपलब्ध आहे.
लहान वयातच त्यांनी गावात धार्मिक कथा सांगण्यास सुरुवात केली आणि पुढे इतर गावांमध्येही त्यांच्या कथांचे आयोजन होऊ लागले. छतरपूर जिल्ह्यातील गार्हा येथील बागेश्वर धाम हे त्यांचे प्रमुख केंद्र बनले असून तिथे धार्मिक कार्यक्रम होत गेले, त्यांची लोकप्रियताही वाढत गेली. पर्चीच्या माध्यमातून भक्तांच्या समस्या सांगण्याच्या दाव्यांमुळे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. समर्थक ही पद्धत धार्मिक श्रद्धेचा भाग मानतात, तर अंनिससह काही संघटनांनी त्यांच्या कथित चमत्कारांची वैज्ञानिक पडताळणी करण्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे ते धार्मिक क्षेत्राबरोबरच सार्वजनिक चर्चेतही सातत्याने चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.