नागपुरहून मंडल्याला जाणाऱ्या खासगी बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न, कंडक्टरवर छेडछाडीचा आरोप; गुन्हा दाखल
नागपुरातून मंडल्याकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये २१ वर्षांच्या तरुणीशी कंडक्टरने अश्लील वर्तन केल्याचा आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तरुणीने विरोध करत आरडाओरडा केल्यानंतर कंडक्टर घाबरून मागे हटला. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागपुरात एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणीशी कंडक्टरने अश्लील वर्तन केल्याचा आणि अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ही घटना नागपुरातून मध्य प्रदेशातील मंडला इथे जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी मध्य प्रदेशातील मंडला इथली रहिवासी आहे. सध्या ती नागपूर शहरात एका कुटुंबाकडे घरकाम करते आणि याच कामासाठी ती काही काळापासून नागपुरात राहत आहे. सुमारे १२ दिवसांपूर्वी ती आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी गावी, म्हणजे मंडल्याला जाण्यासाठी नागपुरातील एमपी बस स्टँडवर पोहोचली होती. तिथून ती रात्री साधारण साडेदहा वाजता विजयंत ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसून मंडल्याकडे रवाना झाली. बस पुढे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी बसमधले बहुतांश प्रवासी झोपी गेले होते.
तक्रारीनुसार, बस एका निर्मनुष्य भागातून जात असताना कंडक्टर तरुणीच्या आजूबाजूला घुटमळू लागला. इतर प्रवासी झोपेत असल्याने तरुणी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलणी केली आणि आक्षेपार्ह वर्तन सुरू केल्याचा आरोप आहे. तरुणीने याला विरोध केला, मात्र तरीही कंडक्टरने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणीने धाडस दाखवत जोरदार विरोध करत ओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून कंडक्टर घाबरला आणि कथितरित्या मागे हटला.
मंडल्याला पोहोचल्यानंतर तरुणीने या घटनेबाबत लगेच कुठेही तक्रार केली नाही. काही दिवसांनी, १५ सप्टेंबरला ती पुन्हा नागपुरात परतली. नागपुरात परतल्यावर तिने ज्या कुटुंबाकडे ती काम करते, त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांसोबत ती सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे तिने ही तक्रार नोंदवली.
पीडित तरुणीच्या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी खासगी बसच्या कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कंडक्टरची ओळख पटवून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पुढील तपासानंतर संपूर्ण घटनाक्रमाची खातरजमा करून त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.