नागपूरच्या फुटाळ्यात २५ वर्षांच्या तरुण वकिलाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले- मम्मी पप्पा मला माफ करा
नागपूरच्या फुटाळा परिसरात एका तरुण वकिलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. घरच्यांशी संपर्क होत नसल्याने घरमालकाने रूम तपासली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
नागपूरच्या फुटाळा परिसरात २५ वर्षांच्या तरुण वकिलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव दादा नियोजित किणकर असे असून तो न्यू फुटाळा येथे राहत होता. ही घटना अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दादा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पटंजी गावचा राहणारा होता. त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि नागपुरात एका सिनियर वकिलाकडे तो इंटर्नशिप करत होता. शिक्षण पूर्ण करून वकिली क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तो घरापासून दूर नागपुरात राहत होता. फुटाळा भागात लक्ष्मी भलावी यांच्या घरी तो भाड्याने राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दादाचे आपल्या घरच्यांशी रोज फोनवर बोलणे व्हायचे. तो नियमितपणे आई-वडिलांशी संपर्कात राहायचा. मात्र बुधवारी त्याने घरी फोन केला नाही, त्यामुळे घरच्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा फोन करूनही त्याने रिस्पॉन्स दिला नाही.
असे आधी कधीच घडले नव्हते, त्यामुळे घरच्यांना हे वेगळे वाटले आणि त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी लगेच घरमालकाशी संपर्क साधून दादाची चौकशी करण्यास सांगितले. घरमालकाने दादाच्या रूमच्या दरवाजावर नॉक केले, पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही.
दरवाजा उघडत नसल्याने घरमालकाने खिडकीतून आत डोकावून पाहिले. त्यावेळी दादा गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. हे पाहून घरमालक हादरला आणि त्याने ही घटना लगेच पोलिसांना कळवली.
माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. रूमची झडती घेताना पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये दादाने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार न धरण्याचे लिहिले होते. आई-वडिलांसोबत राहू न शकल्याबद्दल त्याने त्यांची माफी मागितली होती आणि आपल्या बहिणीची काळजी घेण्याबाबतही नोटमध्ये लिहिले होते.
पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली आहे. सध्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.