सांगलीत सासऱ्याची आत्महत्या; सून, तिचे वडील व मावशीवर गुन्हा नोंद
वाळवा तालुक्यातील मसुचीवाडीतील ६३ वर्षांच्या विश्वास फाटक यांनी शेतात तणनाशक प्यायले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ईश्वरपूर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात मसुचीवाडी येथे राहणारे विश्वास फाटक (वय ६३) यांनी २१ ऑक्टोबरला सायंकाळी आपल्या स्वतःच्या शेतात जाऊन तणनाशक प्यायले. त्यांनी विषारी औषध घेतल्याचे समजताच त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विश्वास फाटक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या तिघांवर आहे. त्यांच्या सुनेचे नाव संजना अविनाश पवार, तिच्या वडिलांचे नाव अविनाश ज्ञानदेव पवार आणि तिच्या मावशीचे नाव स्नेहल प्रवीण गलांडे असे आहे.
फाटक यांचा मुलगा ऋषिकेश हे शिक्षक आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे २०२४ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. त्यांना ७ वर्षांचा एक मुलगा आहे. मुलाचे आणि घराचे पुढे कसे होईल, याचा विचार करून ऋषिकेश यांनी संजना पवार हिच्याशी दुसरे लग्न केले. पण काही दिवसांतच हे लग्न त्यांना जड जाऊ लागले.
आरोपानुसार, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत संजनाचे वडील अविनाश हे ऋषिकेश यांच्या घरी गेले. "मुलीला व्यवस्थित नांदवायचे असेल तर १५ लाख रुपये द्यावे लागतील," अशी मागणी करून त्यांनी शिवीगाळ केली आणि मुलीला सोबत घेऊन गेले. संजना गेल्यानंतर फाटक कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला. संजनाचा हा दुसरा विवाह असून तिने पहिल्या लग्नाची गोष्ट लपवून ठेवली होती, हे ऋषिकेश यांच्या लक्षात आले.
संजना माहेरी गेल्यावर तिच्या घरच्यांनी पैशांसाठी फाटक कुटुंबामागे तगादा लावला, असा आरोप आहे. लग्नाचा खर्च, पोटगी आणि पुढील पालनपोषण यासाठी आता १५ लाखांऐवजी २० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. पैसे दिले नाहीत तर संजनाकडून सासऱ्यांविरुद्ध, म्हणजे विश्वास फाटक यांच्याविरुद्ध, बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकीही संजनाच्या घरच्यांकडून वारंवार दिली जात होती, असे यात म्हटले आहे.
या धमकीमुळे विश्वास फाटक प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. समाजात होणारी बदनामी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवले जाण्याची भीती यामुळे ६३ वर्षांच्या या सासऱ्याने विष पिऊन आयुष्य संपवले. लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून फारशी चौकशी न करता लग्न ठरवले गेलेल्या एका शिक्षक कुटुंबावर ही वेळ आली आहे. गुन्हा नोंद झालेल्या तिघांवर हे आरोप ठेवण्यात आले आहेत. ईश्वरपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.