मुंबईची ड्रॅग आर्टिस्ट संस्कृती सावंत यांनी उलगडला संकेत ते 'जेंटलमन गागा'पर्यंतचा प्रवास
नवदुर्गा पॉडकास्टमध्ये संस्कृती सावंत यांनी नावामागची कहाणी, स्वतःला स्वीकारण्याचा संदेश आणि मुंबईशी असलेले नाते मोकळेपणाने सांगितले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
समाजाच्या चौकटी, लोकांच्या नजरा आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे अनेक प्रश्न यांतून स्वतःची ओळख उभी करणे सोपे नसते. मुंबईतील प्रसिद्ध ड्रॅग आर्टिस्ट संस्कृती सावंत यांनी मात्र स्वतःच्या भावना स्वीकारून त्या जगासमोर मांडण्याचे धाडस दाखवले. 'मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी व्हायचं होतं', अशी त्यांची सुरुवात होती. संकेत सावंत, मग 'जेंटलमन गागा' आणि पुढे संस्कृती सावंत, हा त्यांचा प्रवास फक्त नावाचा किंवा दिसण्याचा नाही. तो कला, आत्मशोध आणि स्वतःला व्यक्त करण्याचा प्रवास आहे.
नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवसानिमित्त नवदुर्गा या विशेष पॉडकास्टमध्ये सूत्रसंचालिका लीनल देशमुख यांनी संस्कृती सावंत यांच्याशी गप्पा मारल्या. संकेत या नावाने सुरू झालेला प्रवास, 'जेंटलमन गागा' म्हणून मिळालेली ओळख आणि संस्कृती हे नाव स्वीकारण्यामागची भूमिका त्यांनी यात सांगितली. लहानपणापासूनच्या भावना आणि ड्रॅग आर्टच्या दुनियेतले अनुभवही त्यांनी मनमोकळेपणाने मांडले.
नावाबद्दल बोलताना त्यांनी मराठी संस्कृती, परंपरा आणि कुटुंबाशी असलेले नाते अधोरेखित केले. आपण सावंत कुटुंबातून आलो आणि आपल्या सांस्कृतिक मुळांचा आपल्याला अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या. घरातले संस्कार, धार्मिक परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव लहानपणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर राहिला आहे. ड्रॅग आर्टिस्ट म्हणून काम सुरू केल्यावर भारतीय संस्कृतीतले वेगवेगळे घटक सादरीकरणात आणण्याची आवड निर्माण झाली. म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाशी आणि मुळांशी जोडलेले 'संस्कृती' हे नाव निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांना 'जेंटलमन गागा' या नावानेही ओळखले जाते. 'गागा' या शब्दातला वेगळेपणा आणि थोडासा भन्नाट स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळतो. कलेच्या प्रवासात या नावाने त्यांना ओळख दिली. संस्कृती हे नाव स्वीकारल्यानंतरही अनेक जण प्रेमाने त्यांना 'गागा'च म्हणतात. संस्कृती यांच्या मते, स्वतःचे व्यक्तिमत्त्व लपवण्यापेक्षा त्यातला वेगळेपणा स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
या संवादातला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार. समाज एखाद्या व्यक्तीला स्वीकारेल की नाही, यापेक्षा त्या व्यक्तीने स्वतःला स्वीकारणे जास्त महत्त्वाचे आहे, असे संस्कृती सावंत यांनी सांगितले. 'जग तुम्हाला स्वीकारो अथवा न स्वीकारो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला स्वीकारणे', असा संदेश त्यांनी पॉडकास्टमधून दिला. लैंगिक ओळख, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि समाजाच्या अपेक्षा यावर बोलताना त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आत्मविश्वास ठेवण्यावर भर दिला.
मुंबईबद्दल बोलताना संस्कृती भावनिक झाल्या. या शहराने आपल्याला प्रेम दिले आणि आपल्या वेगळेपणासह स्वीकारले, असे त्यांनी सांगितले. कामासाठी इतर ठिकाणी जावे लागले तरी पुन्हा मुंबईतच परत येणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई हे फक्त कामाचे शहर नसून आपल्या आयुष्याचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मनोरंजन क्षेत्रात त्यांना जवळपास १३ वर्षे झाली आहेत आणि या काळात अनेक प्रकारची कामे करण्याची संधी मिळाली. या क्षेत्रात वैयक्तिक पातळीवर त्रास देणारा अनुभव आपल्याला आला नाही, असे त्यांनी सांगितले. काम करताना आपली कला, मेहनत आणि व्यक्तिमत्त्व यांना महत्त्व मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संस्कृती यांना लहानपणापासून नृत्य आणि कलेची आवड होती. शाळा आणि कॉलेजच्या दिवसांत त्यांनी नृत्य आणि चित्रकलेच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. 'माझ्या डिक्शनरीमध्ये लाज नावाचा शब्दच नाही', असे सांगत त्यांनी आपल्या बिनधास्त स्वभावाचे वर्णन केले. नृत्य आणि संगीत आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे ड्रॅग आर्टिस्ट म्हणून काम करणे हा त्याच कलात्मक प्रवासाचा एक भाग आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या मते ड्रॅग म्हणजे फक्त वेगळी वेशभूषा करण्याची कला नाही. त्यात संगीत, नृत्य, अभिनय, फॅशन आणि स्वतःला सर्जनशील पद्धतीने व्यक्त करणे या सगळ्याचा समावेश असतो.
गेली सात ते आठ वर्षे त्या ड्रॅग शो करत आहेत. ड्रॅग परफॉर्मन्सशिवाय होस्टिंग, स्टायलिंग आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंगमध्येही त्या सक्रिय आहेत. 'गली फॅशन' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. कलाकार म्हणून स्वतःची आवड जपताना पोट भरण्यासाठी वेगवेगळी कामे करावी लागतात, आणि ही सगळी कामे आपल्या व्यावसायिक प्रवासाचा भाग आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पॉडकास्टमध्ये संस्कृती यांनी भारतीय संस्कृतीतील अर्धनारीश्वर संकल्पनेचाही उल्लेख केला. भारतीय परंपरेत अर्धनारीश्वराचे स्वरूप मान्य केले जाते आणि वेगवेगळ्या धार्मिक व सांस्कृतिक संदर्भांत स्त्री आणि पुरुष तत्त्वांची एकात्मता दिसते. तरीही प्रत्यक्ष समाजात वेगळी लैंगिक ओळख किंवा अभिव्यक्ती असलेल्या व्यक्तींना सहज स्वीकारले जात नाही, या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा व्यक्तींबद्दल समाजात अधिक समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि आदर निर्माण व्हायला हवा, हे त्यांच्या बोलण्यातून पुढे आले.
नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीची वेगवेगळी रूपे पूजली जातात. पण व्यक्तीच्या ओळखीचा आणि अस्तित्वाचा स्वीकार फक्त उत्सवापुरता न राहता प्रत्यक्ष आयुष्यातही दिसला पाहिजे, असा विचार या संवादातून मांडला गेला. समाज काय म्हणेल यापेक्षा आपण स्वतःकडे कसे पाहतो आणि आपल्या अस्तित्वाचा किती आदर करतो, हे जास्त महत्त्वाचे आहे, असा संदेश संस्कृती सावंत यांच्या अनुभवातून मिळतो.