पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने ७८ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये; मालाडमधील प्रकार, दरमहा
मालाडमधील कुरार गावातील एका डे-केअर सेंटरमध्ये ७८ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये ठेवलेला आढळला. दुर्गंधी पसरल्यानंतर लोकांनी पोलिसांना कळवले आणि हा प्रकार उघडकीस आला.
भविष्यात कधी तरी विज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने एका कुटुंबाने ७८ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीजरमध्ये जपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाड परिसरात समोर आला आहे. कुरार गावातील कोकणीपाडा परिसरात असलेल्या एका डे-केअर सेंटरमध्ये हा मृतदेह ठेवलेला होता.
परिसरात दुर्गंधी पसरली, तेव्हा लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह जतन करण्यासाठी कुटुंबाकडून दरमहा १.६० लाख रुपये दिले जात होते, अशी माहिती आहे.
कॅन्सरच्या आजाराने ९ जून २०२२ रोजी या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांची मुलगी अमेरिकेत राहते आणि वडिलांशी तिचे भावनिक नाते होते. अमेरिकेत क्रायोनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मृतदेह अतिशय कमी तापमानात जतन केला जातो. पुढे विज्ञानाची प्रगती झाल्यावर अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, अशी या कुटुंबाची धारणा होती. त्यातूनच मृतदेह जतन करण्यासाठी कुटुंबाने मालाडमधील या डे-केअर सेंटरची मदत घेतली.
पोलिसांनी मृताच्या मुलीची चौकशी केली. वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता, असे तिने पोलिसांना सांगितले. शक्य तितका काळ आम्हाला पार्थिव जतन करून ठेवायचे होते, त्यासाठी आम्ही इंटरनेटवर माहिती शोधली आणि अमेरिकेतील क्रायोनिक्स तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, असेही तिने सांगितले.
या प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या, म्हणजेच बीएमसीच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे डे-केअर सेंटर बीएमसीने तीन महिन्यांपूर्वी सील केले होते. तेव्हा या सेंटरमधील फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या कसे लक्षात आले नाही, असा प्रश्न आता पडला आहे.
कुटुंबीयांनी पोलिसांकडे मृत्यू प्रमाणपत्र आणि बीएमसीने दिलेली कागदपत्रे सोपवली आहेत. मृतदेहाची स्थिती तपासण्यासाठी कूपर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात आहे, आणि हा प्रकार पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.
अशा पद्धतीने मृतदेह जतन करणे भारतात कायदेशीर आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.