एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळात अर्ह वाघमारेला दोन गटांत विजेतेपद
फिडे गुणांकित अर्ह वाघमारेने १३ आणि १४ वर्षांखालील गटांत पहिला क्रमांक मिळवला, तर १० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाण विजेती ठरली. स्पर्धेत २१५ शालेय खेळाडू उतरले होते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित अर्ह वाघमारे याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. १३ वर्षांखालील आणि १४ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत त्याने पहिला क्रमांक पटकावला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) सहप्रायोजकत्व या स्पर्धेला लाभले होते.
१३ वर्षांखालील गटात अर्हने सगळेच सामने जिंकले आणि कोणालाही संधी दिली नाही. १४ वर्षांखालील गटात मात्र त्याला चांगलीच झुंज द्यावी लागली. पाचव्या आणि निर्णायक फेरीत फिडे गुणांकित प्रणव जैन एकटाच आघाडीवर होता. त्याच्याविरुद्ध अर्हने ३२व्या चालीत बाजी मारली. या विजयामुळे अर्हचे एकूण ४.५ गुण झाले आणि तो पहिल्या स्थानावर पोहोचला.
दोन्ही गटांत विजेता ठरलेल्या अर्हला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील फिडे गुणांकित सब-ज्युनियर खेळाडूंसह एकूण २१५ शालेय बुद्धिबळपटू खेळले. महानगरपालिका शाळांतील २८ खेळाडू पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरले आणि त्यांनीही चांगला खेळ केला, ही विशेष गोष्ट ठरली.
१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणने बाजी मारली. फिडे गुणांकित अंश शर्मा आणि ग्रीवा जैन यांचे आव्हान तिने मोडून काढले. साखळीतले पाचही सामने जिंकून तिने विजेतेपद मिळवले. अंश शर्मा याचे ४ गुण होऊन तो दुसरा आला, ग्रीवा जैनचेही ४ गुण झाले आणि ती तिसरी आली. साधना खुमार हिने ३ गुणांसह चौथे, तर माहीर वडांबे याने ३ गुणांसह पाचवे स्थान घेतले.
सहा वर्षांखालील गटात एरिक पिकार्डो पाच गुण मिळवून पहिला आला. आरीन शुक्ला दुसरी, विहान अहुजा तिसरा, झेउस वाडिया चौथा आणि सोहम कांबळी पाचवा राहिला. या चौघांचेही प्रत्येकी ४ गुण होते.
१४ वर्षांखालील गटाची क्रमवारी अशी राहिली: अर्ह वाघमारे ४.५ गुणांसह पहिला, प्रणव जैन ४ गुणांसह दुसरा आणि अर्हम गाडा ४ गुणांसह तिसरा. आर्यन उपरकर आणि मयुरेश पाटील यांचे प्रत्येकी ३.५ गुण झाले; ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले.
मुंबई महापौर, सिबीईयुएम, आरएमएमएस आणि मुंबई शहर बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. पारितोषिक वितरणाला माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, क्रीडापटू गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी सुनील साळवी, विष्णू तांडेल आणि जनार्दन मोरे उपस्थित होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आणि सिबीईयुएमचे पदाधिकारीही कार्यक्रमाला हजर होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.