माउंट अबूच्या दिलवारा जैन मंदिरातील संगमरवरी कोरीवकाम पर्यटकांना भुरळ घालते
राजस्थानच्या माउंट अबूमधील दिलवारा जैन मंदिर त्याच्या संगमरवरी नक्षीकामासाठी ओळखले जाते. पाच प्रमुख मंदिरांचा हा समूह श्वेतांबर जैन परंपरेशी संबंधित आहे.
अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले माउंट अबू हे राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन आहे. याच ठिकाणी जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले दिलवारा जैन मंदिर आहे. हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ म्हणून नाही, तर तिथल्या सौंदर्यामुळेही पर्यटकांना नेहमी आकर्षित करत आले आहे. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून ही संपूर्ण वास्तू उभारण्यात आली आहे.
या मंदिराचा इतिहास ११ ते १३ व्या शतकादरम्यान गुजरातवर राज्य करणाऱ्या चालुक्य म्हणजेच सोळंकी राजवंशाच्या काळापर्यंत मागे जातो. सांगितले जाते की गुजरातचे सोलंकी शासक भीमदेव प्रथम यांचे मंत्री विमल शाह यांनी इसवी सन १०३१ मध्ये या मंदिराची उभारणी केली. भारतातील सर्वात सुंदर मंदिरांमध्ये याची गणना होते आणि इथली वास्तुकला पाहणाऱ्यांना मोहित करते. संगमरवरी दगडावर केलेले नक्षीकाम इतके बारीक आणि सुबक आहे की जगातील सर्वात सूक्ष्म कोरीवकामांपैकी एक मानले जाते.
बाहेरून पाहिले तर हे मंदिर अगदी सामान्य मंदिरासारखे दिसते, पण आत प्रवेश केल्यावर मात्र संगमरवरी खडकावरील नाजूक कलाकुसर नजरेस पडते. इथले वातावरण आणि कोरीवकाम इतके देखणे आहे की एकदा पाहिल्यावर पर्यटकांची नजर तिथून हलत नाही.
दिलवारा जैन मंदिर समूहात एकूण पाच प्रमुख मंदिरे आहेत आणि ही सगळी जैन धर्मातील श्वेतांबर संप्रदायाशी संबंधित आहेत.
पहिले मंदिर म्हणजे विमल वसाही, जे इसवी सन १०३१ मध्ये बांधले गेल्याचे सांगितले जाते. हे मंदिर तीर्थंकर भगवान ऋषभदेव म्हणजेच आदिनाथ यांना समर्पित आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याला रंग मंडप असेही म्हटले जाते. छतावरील नक्षीकाम, विशाल मंडप आणि स्तंभ पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.
दुसरे मंदिर लूणा वसाही. गुजरातच्या शासकांचे मंत्री वास्तुपाल आणि तेजपाल यांनी इसवी सन १२३० मध्ये हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. हे मंदिर बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांना समर्पित आहे. इथे संगमरवरी कल्पवृक्ष आणि हत्ती मंडप पाहायला मिळतो.
तिसरे मंदिर पित्तलहर या नावाने ओळखले जाते. हे देखील भगवान ऋषभदेव म्हणजेच आदिनाथ यांना समर्पित आहे आणि पाच मंदिरांमधील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर मानले जाते.
चौथे मंदिर पार्श्वनाथ मंदिर. हे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना समर्पित असून याचा परिसर या पाच मंदिरांमध्ये सर्वात उंच आणि तीन मजली आहे.
पाचवे आणि शेवटचे मंदिर महावीर स्वामी मंदिर. हे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांना समर्पित आहे. इतर मंदिरांच्या तुलनेत या मंदिराचा आकार थोडा लहान आहे, पण भिंतींवरील नक्षीकाम इतके सुंदर आहे की तेच या मंदिराकडे लोकांना खेचून आणते.