महिंद्रा BE 7 चे नवे स्पाय फोटो समोर, कंपनीचा दावा एका चार्जमध्ये 700 किलोमीटर रेंज
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईतील बीकेसी परिसरात चाचणीदरम्यान झाकलेल्या स्वरूपात दिसलेली महिंद्राची आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही BE 7 भारतीय बाजारपेठेत 2027 मध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे.
महिंद्रा कंपनी आपल्या इलेक्ट्रिक एसयूव्हींची रेंज वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या आगामी महिंद्रा BE 7 या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नवे स्पाय फोटो आता समोर आले आहेत. मुंबईतील बीकेसी परिसरात चाचणी सुरू असताना ही गाडी पूर्णपणे कॅमफ्लाज केलेल्या, म्हणजे झाकलेल्या स्वरूपात दिसली. या नव्या फोटोंमुळे गाडीची डिझाईन, फीचर्स आणि संभाव्य स्पेसिफिकेशन्स याबद्दल अनेक रंजक गोष्टी उघड झाल्या आहेत.
डिझाईनमध्ये आधुनिक आणि भविष्यकालीन टच दिसतो. गाडीला नवे फ्लश-डिसेंट डोअर हँडल्स दिले आहेत, जे इलेक्ट्रिकली बाहेर येतात. त्याशिवाय फ्रेमलेस विंडो, क्लॅमशेल बोनट, मोठे सी-शेप लायटिंग एलिमेंट्स आणि रुंद व्हील आर्च मिळण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीमध्ये 19 इंचाचे मोठे अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. BE 6 च्या तुलनेत ही एसयूव्ही आकाराने मोठी असेल आणि जास्त रुबाबदार वाटेल. सेफ्टी आणि सोयीच्या दृष्टीने मागच्या बाजूला लपवलेला वायपर आणि वॉशर, तसेच डाव्या बाजूला मागच्या भागात चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो.
केबिनमध्ये कंपनीच्या कॉन्सेप्ट मॉडेलसारखाच आकर्षक डॅशबोर्ड दिसू शकतो. ड्रायव्हरसाठी ट्रिपल स्क्रीन सेटअप, स्पोर्टी सीट्स आणि नवीन सेंटर कन्सोल दिला जाईल. प्रवाशांच्या आरामासाठी व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर्ड सीट्स, 1400 वॅटची 16 स्पीकरची हरमन साऊंड सिस्टीम, अड्रेनॉक्स कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि लेव्हल 2+ एडीएएस (ADAS) अशी अॅडव्हान्स फीचर्स मिळतील. ऑटो पार्किंग आणि प्रीमियम एम्बिएंट लायटिंगमुळे गाडीच्या आतला लूक अधिकच रिच वाटेल.
बॅटरी, पॉवर आणि रेंजबद्दल सांगायचे तर, या नव्या ईव्हीमध्ये 59 kWh, 70 kWh आणि 79 kWh चे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही सिंगल चार्जमध्ये 700 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते. प्रत्यक्ष रस्त्यावर धावताना मात्र ही गाडी सुमारे 500 किलोमीटरची रिअल-वर्ल्ड रेंज देऊ शकेल.
पॉवरच्या बाबतीत रिअर-व्हील ड्राइव्ह आणि सिंगल मोटर सेटअपमुळे 282 बीएचपीपर्यंत पॉवर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ड्युअल मोटर आणि ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) हा पर्यायही उपलब्ध केला जाऊ शकतो.
महिंद्राची ही बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत 2027 मध्ये अधिकृतपणे लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. लॉन्च झाल्यानंतर ही ईव्ही देशातील इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करू शकते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.