बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

इयत्ता सहावीची नवी पाठ्यपुस्तके आली; इतिहासातून काही परिच्छेद वगळले, विज्ञानात प्राचीन भारतीय विद्वान

इयत्ता सहावीची नवी पाठ्यपुस्तके आली; इतिहासातून काही परिच्छेद वगळले, विज्ञानात प्राचीन भारतीय विद्वान छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिक्षण PT24 टीम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बालभारतीने याच शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वीची इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवी पुस्तके आणली आहेत.

राज्यातील शालेय पुस्तकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळ 'बालभारती'ने याच शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वीची इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवी पाठ्यपुस्तके आणली आहेत. एनसीईआरटीच्या (NCERT) धर्तीवर हे बदल झाले आहेत. नव्या पुस्तकांत प्राचीन भारतीय ज्ञानग्रंथ, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विद्वानांना ठळक जागा मिळाली आहे. इतिहासाच्या काही सामाजिक आणि राजकीय भागांची मांडणीही बदलली आहे.

विज्ञानाच्या पुस्तकांत आधुनिक वैज्ञानिक सिद्धांतांबरोबरच प्राचीन भारतीय विद्वानांचे योगदानही आले आहे. 'फोर्स अँड प्रेशर' (Force and Pressure) या धड्यात गुरुत्वाकर्षणाबद्दल सांगताना आयझॅक न्यूटन यांच्याबरोबर भास्कराचार्य २ यांचाही उल्लेख आहे. पुस्तकानुसार, भास्कराचार्य २ यांनी सुमारे ९५० वर्षांपूर्वी 'सिद्धांत शिरोमणी' या ग्रंथात पृथ्वी वस्तूंना आपल्याकडे खेचून घेते, हे स्पष्ट केले होते. 'बियॉन्ड द स्काय' या धड्यातील एका विशेष बॉक्समध्ये आर्यभट्ट हे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे समजावून सांगणारे पहिले व्यक्ती होते, अशी माहिती दिली आहे.

महर्षि चरक यांना आयुर्वेदाचे संस्थापक मानून सजीवांच्या वर्गीकरणातले त्यांचे योगदान पुस्तकात घेतले आहे. अंतराळ संशोधनातील भारताची कामगिरी दाखवण्यासाठी चंद्रयान-१, मंगलयान, चंद्रयान-३, आदित्य एल-१ आणि निसार उपग्रह यांचा समावेश केला आहे. 'वेदर वमन ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी आणि पर्यावरण रक्षणातील 'चिपको आंदोलना'त गौरा देवी यांनी दिलेले योगदानही नव्या पुस्तकांत आहे.

भूगोलाच्या नव्या पुस्तकात भारतीय भौगोलिक इतिहासाला जागा दिली आहे. भारतीय भूगोलाच्या इतिहासावरील नव्या सेक्शनमध्ये वेद, पुराण, उपनिषदे आणि सूर्य सिद्धांत यांचे संदर्भ आहेत. पृथ्वीचे वर्णन 'सप्तद्वीप' असे करताना ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबद्दलच्या वैदिक विचारांची तुलना 'बिग बँक सिद्धांताशी' केली आहे.

आधीच्या पुस्तकांत फक्त ग्रीनिच मध्यरेखेचा उल्लेख होता. आता नव्या पुस्तकात प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैनला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानले होते आणि पहिल्यांदा मूळ रेखांशाची (Base Longitude) संकल्पना मांडली होती, असे स्पष्ट केले आहे.

इतिहासाच्या पुस्तकात प्राचीन वैद्यकशास्त्र, प्रमुख ऐतिहासिक व्यक्ती आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांच्या वर्णनात बदल झाले आहेत. 'फादर ऑफ सर्जरी' मानल्या जाणाऱ्या सुश्रुत यांचे नाक पुनर्रचना (Nose Reconstruction) तंत्र आणि 'सुश्रुत संहिता' या ग्रंथाचा सविस्तर उल्लेख आहे. चाणक्य यांचे 'अर्थशास्त्र' आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या उत्थानातील त्यांची भूमिकाही सविस्तर जोडली आहे.

आधीच्या पुस्तकांत वर्णव्यवस्था आणि जातीय विषमतेच्या विकासाचा सविस्तर उल्लेख होता. उत्तर वैदिक काळातील यज्ञाचे विधी आणि पुरोहित वर्गाचे विशेषाधिकार यांच्याशी संबंधित परिच्छेद आता हटवला आहे. त्यात सामाजिक स्थान जन्मावर आधारित असते, असे म्हटले होते. त्याऐवजी आता वैदिक मूल्ये, नैतिक कर्तव्ये आणि निसर्ग पूजेवर भर दिला आहे.

वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणी तशाच ठेवल्या आहेत. पण ईसवीसन पूर्व सहाव्या शतकात नव्या धर्मांचा उदय जातीय भेदभाव आणि सामाजिक परिस्थितीशी जोडणारा जुना परिच्छेद काढून टाकला आहे. त्याऐवजी हा विषय भारताची 'धार्मिक विविधता' म्हणून मांडला आहे. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणांमधून 'परदेशी टोळ्यांचे आक्रमण' हा मुद्दा पूर्णपणे वगळला आहे. आता या ऱ्हासाची कारणे म्हणून नदीच्या पात्रातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि सुमेरियन संस्कृतीसोबतच्या व्यापारातील घसरण एवढीच दिली आहेत.

#नागपूर#पढ़ाई#PT24#Education#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ