लांब राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत या गोष्टी नक्की तपासा
लांब अंतरासाठी इलेक्ट्रिक स्कूटर निवडताना फक्त रेंज पुरेशी नाही. सीट, सस्पेंशन, रायडिंग पोझिशन, थर्मल मॅनेजमेंट आणि सेफ्टी फीचर्सकडेही लक्ष द्यायला हवे.
इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर आता फक्त शहरातल्या छोट्या प्रवासापुरता राहिलेला नाही. रोजच्या कम्यूटसोबतच लांब राइड किंवा इंटरसिटी टुरिंगसाठीही अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटर वापरत आहेत. मात्र लांब अंतरासाठी स्कूटर निवडताना फक्त रेंज बघणे पुरेसे नाही. सीटची रचना, सस्पेंशन, बॅटरी कॅपसिटी, थर्मल मॅनेजमेंट आणि सेफ्टी फीचर्स हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्कूटर घ्यायचा विचार करत असाल, तर या सगळ्या गोष्टी एकत्र तपासून बघायला हव्यात.
लांब प्रवासासाठी बॅटरी खऱ्या वापरात चांगली रेंज देणारी हवी. मोटर सातत्याने परफॉर्मन्स देणारी आणि चार्जिंग सिस्टम चांगली असणेही गरजेचे आहे. 60-70 km/h वेगाने सलग राइड केली, तर मोटर आणि बॅटरीवर जास्त लोड येतो. अशा वेळी चांगली थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम परफॉर्मन्स टिकवून ठेवण्यास मदत करते. चांगल्या रेंजसोबत फास्ट चार्जिंग नेटवर्कही लांब प्रवासात खूप उपयोगी ठरते.
आरामाच्या दृष्टीने सीटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लांब राइडमध्ये आरामासाठी सीटचा आकार आणि फोमची क्वालिटी खूप महत्त्वाची असते. सीट खूप मऊ असेल तर शरीर त्यात जास्त खाली बसते आणि थोड्या वेळाने पाठ किंवा टेलबोनवर दबाव जाणवू शकतो. म्हणूनच योग्य सपोर्ट देणारी मल्टी-डेन्सिटी फोम सीट फायद्याची ठरते.
सस्पेंशन आणि रायडिंग पोझिशनही तेवढीच महत्त्वाची आहे. हँडलबार, सीटची उंची आणि फ्लोअरबोर्ड यांच्यातील योग्य अंतर रायडिंग पोझिशन ठरवते. गुडघे आणि पाठ नैसर्गिक स्थितीत राहिले तर थकवा कमी होतो. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि प्रोग्रेसिव्ह मोनोशॉकसारखे सस्पेंशन खराब रस्ते आणि स्पीड ब्रेकरवरही आरामदायी राइड देण्यास मदत करतात.
सेफ्टी फीचर्सही तपासायला हवीत. लांब प्रवासासाठी CBS, ट्रॅक्शन कंट्रोल, स्किड कंट्रोल आणि TPMS ही फीचर्स खूप उपयोगी ठरतात. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसारखी फीचर्सही राइड अधिक सुरक्षित करतात. FallSafe आणि क्रॅश डिटेक्शनसारखी फीचर्स आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त सुरक्षा देऊ शकतात.
थोडक्यात, लांब राइडसाठी स्कूटर निवडताना निर्णय फक्त रेंजवर न घेता कम्फर्ट, परफॉर्मन्स, चार्जिंग आणि सेफ्टी या सर्व गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.