कोरपन्यात पोस्टातील सुकन्या, मुदत ठेवीचे लाख रुपये डाकपालाने स्वतःकडेच ठेवले, गुन्हा दाखल
कोळशी (खुर्द) पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांचे १ लाख १४ हजार रुपये सरकारी हिशोबात न भरता तत्कालीन शाखा डाकपालाने स्वतःकडे ठेवल्याचे उघड झाले, कोरपना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या कोळशी (खुर्द) पोस्ट ऑफिसमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बचत खाती, मुदत ठेव आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या नावाखाली सामान्य लोकांकडून घेतलेले पैसे सरकारी खात्यात न भरता तत्कालीन शाखा डाकपालाने स्वतःच्या फायद्यासाठी लाटल्याचं समोर आलं आहे. एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा हा अपहार असल्याचं टपाल खात्याच्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे.
हे प्रकरण कसं उघडकीस आलं, याचीही एक गोष्ट आहे. विवेक बाळू बनसोडे (वय २८, मूळ रा. भीमनगर, सांगोला, जि. सोलापूर) हा सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२५ या काळात कोळशी (खुर्द) इथे शाखा डाकपाल म्हणून काम करत होता. २५ मार्च २०२५ रोजी त्यानं वैद्यकीय रजेसाठी अर्ज दिला होता, पण तो मंजूर झाला नव्हता. दुसऱ्याच दिवशी पोस्ट ऑफिस बंद असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. ही माहिती मिळताच उपविभागीय डाक निरीक्षक अनिल गोविंदराव टेकाम आणि टपाल पर्यवेक्षक मिथुन टोंगे तिथे पोहोचले, तेव्हा ऑफिसला कुलूप लागलेलं दिसलं. वरिष्ठांना कळवून पंचांसमोर ऑफिस उघडण्यात आलं आणि सगळी कागदपत्रं तपासली गेली.
या तपासणीत ग्राहकांनी नवीन खाती उघडण्यासाठी भरलेले अर्ज आणि पावत्या तशाच पडून असल्याचं दिसलं. उषा गुलाब पायताडे यांच्या नावे मुदत ठेव खात्यासाठी घेतलेला एक लाख रुपये आणि इतर खातेदारांचे सुकन्या योजना व बचत खात्यांसाठी घेतलेले पैसे सरकारी हिशोबात जमाच झाले नव्हते. याशिवाय बंद पडलेल्या आवर्ती ठेव (आरडी) खात्यांमध्येही पैसे घेतले गेले होते आणि खातेदारांना अधिकृत सही-शिक्क्याच्या पावत्याही दिल्या गेल्या होत्या. पण हे सगळे पैसे टपाल खात्याच्या रोजच्या हिशोबात कधीच दाखवले गेले नाहीत. विभागीय चौकशीत आरोपी डाकपालाने एकूण १ लाख १४ हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी हडपल्याचं स्पष्ट झालं.
टपाल खात्याची चौकशी पूर्ण झाल्यावर डाक निरीक्षक अनिल टेकाम यांनी मूळ कागदपत्रांच्या आधारे १८ सप्टेंबर २०२६ रोजी कोरपना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी विवेक बनसोडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(५) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत. गावखेड्यातल्या गरीब लोकांच्या मेहनतीच्या बचतीवरच पोस्टातल्या कर्मचाऱ्याने हात साफ केल्याने परिसरात संतापाची भावना आहे.