मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मुख्यमंत्र्यांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून ३.२५ कोटी उकळल्याचा आरोप; एकाला अटक

मुख्यमंत्र्यांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून ३.२५ कोटी उकळल्याचा आरोप; एकाला अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील ४० वर्षीय आसिफ इस्माईल पठाण याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून एका कंत्राटदाराकडून ३ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या आसिफ इस्माईल पठाण याला मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी ४० वर्षांचा असून तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील 'ओबेरॉय कन्स्ट्रक्शन'चे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची या प्रकरणात मोठी फसवणूक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) त्यांची सुमारे ५० कोटी रुपयांची बिले प्रलंबित होती. ती बिले सहज मंजूर करून देता येतील, असे सांगून आरोपी आसिफ पठाण याने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि थेट मुख्यमंत्र्यांचे कार्यालय (CMO) यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे भासवले. स्वतः मुख्यमंत्र्यांचा OSD असल्याची बतावणी करून त्याने ओबेरॉय यांचा विश्वास मिळवला, असेही पोलिसांनी सांगितले.

बिले मंजूर करून घेण्यासाठी कमिशन द्यावे लागेल, असे सांगून आरोपीने टप्प्याटप्प्याने ३.२५ कोटी रुपये घेतले, असा आरोप आहे. त्यातील १.२५ कोटी रुपयांचा हप्ता घेण्यासाठी ओबेरॉय यांना १० सप्टेंबर रोजी मुंबईत बोलावण्यात आले होते. त्या वेळी आरोपीने ही रक्कम आपल्या साथीदारामार्फत स्वीकारली होती.

एवढे पैसे देऊनही काम मार्गी लागले नाही. वर आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे ओबेरॉय यांना तीव्र संशय आला. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी मुंबईतील मंत्रालयात जाऊन त्या OSD आणि अधिकाऱ्याबद्दल खातरजमा केली. तेव्हा आसिफ पठाण नावाचा कोणताही अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात किंवा मंत्रालयात काम करत नसल्याचे समोर आले. आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओबेरॉय यांनी लगेच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.

ओबेरॉय यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी आसिफ इस्माईल पठाण याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या फसवणुकीत आणखी कोणा मोठ्या अधिकाऱ्याचा किंवा साथीदाराचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीने उकळलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम कुठे ठेवली आहे, हेही पोलीस तपासत आहेत. गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आरोपीने अशाच पद्धतीने आणखी किती कंत्राटदारांना जाळ्यात ओढले, याचा तपासही मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ