मोजताबा खामेनाई यांचा इशारा: मध्य पूर्वेत अमेरिकेला जागा नाही, होर्मुझबाबतही स्पष्ट भूमिका
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनाई यांनी आखाती देशांनी अमेरिकन तळांसाठी ढाल बनू नये असा इशारा दिला आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजताबा खामेनाई याची इराणचा नवा सर्वोच्च नेता म्हणून निवड झाली आहे. मोजताबा याआधी इराणच्या IRGC या सैन्यात होता आणि इराण-इराक युद्धातही त्याचा सहभाग असल्याचे बोलले जाते.
राजकीय जाणकारांच्या मते, वडिलांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेता झालेला मोजताबा हा अमेरिकेसाठी आणखी जास्त धोकादायक ठरू शकतो. मोजताबा सार्वजनिक ठिकाणी फार क्वचित दिसतो. काहींच्या मते या युद्धातील एका हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असेही बोलले गेले आहे. मात्र इराण सरकारने हे सगळे दावे वारंवार फेटाळले आहेत.
मध्य पूर्वेतील उजाड प्रदेशात तेलाचे साठे सापडल्यापासून या भागात अशांतता अधिक वाढलेली दिसते, आणि यामागे अनेक घडामोडी आणि राजकारण कारणीभूत आहे. आधी अमेरिकेने डॉलरला सोन्याशी जोडले होते, तोपर्यंत मध्य पूर्वेत तितका संघर्ष नव्हता. पण काळानुसार सोने टिकाऊ नसून जागतिक राजकारणात तेलाला पर्याय नाही, हे अमेरिकेच्या लक्षात आल्यावर तिने डॉलरला तेलाशी जोडले, आणि तिथून मध्य पूर्वेतील पेट्रो डॉलरचा खेळ सुरू झाला.
त्या काळात आखाती अरब देशांचे इराणसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. इराणपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या देशांनी आपल्या भूमीवर अमेरिकन सैन्याला जागा दिली, आणि यातूनच अमेरिका व इराण थेट आमनेसामने आले.
या युद्धादरम्यान ज्या ज्या देशांनी अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी आपली जमीन वापरू दिली, त्या त्या देशांवर इराणने जोरदार हल्ले केले. यामुळे अमेरिकन सैन्याची पळापळ झाली. इतकेच नव्हे तर अमेरिकन सैनिक आपले तळ सोडून इतर भागांत, हॉटेलांमध्ये राहू लागले, तेव्हा त्याच ठिकाणांवर हल्ले करून इराणने अमेरिकेला आणि तिला जागा देणाऱ्या देशांना धसका भरवला.
यामुळे मध्य पूर्वेत अमेरिका संरक्षण देईल ही कल्पना मोडकळीस येऊ लागली, आणि या देशांनी दबक्या आवाजात इराणसोबत करार करण्याची भाषा सुरू केली. याच पार्श्वभूमीवर मोजताबा यांनी इशारा दिला की, मध्य पूर्वेतील देश यापुढे अमेरिकन तळांसाठी ढाल म्हणून काम करणार नाहीत.
खामेनाई यांच्या मते, पर्शियन आखातातील अमेरिकन सैन्याची उपस्थिती हेच प्रादेशिक अस्थिरतेचे प्रमुख कारण आहे. त्यांनी सांगितले की भविष्यात या भागात अमेरिकेला अधिक ढवळाढवळ करू दिली जाणार नाही. त्यांच्या मते इराण असो वा मध्य पूर्वेतील इतर सगळे देश, हे सार्वभौम आहेत आणि त्यांना अमेरिकेच्या सल्ल्याची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही.
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही इराणने आपली भूमिका कठोर ठेवली आहे. आखातातील परकीय लष्करी उपस्थितीला आव्हान देत खामेनाई यांनी मध्य पूर्वेतील देशांनी अमेरिका आणि इस्रायल यांना बाजूला ठेवून एकजुटीने काम करावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.