कबुतरखाने वादावरून पुन्हा फडफड; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
मुंबईतील बंद कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, त्यांच्या या भूमिकेला मराठी एकीकरण समितीने जोरदार विरोध केला आहे.
मुंबईतील बंद कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कबुतरखाने तातडीने पुन्हा सुरू करावेत या मागणीसाठी जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनासोबतच आमरण उपोषणही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबुतरखान्यांवरून धार्मिक श्रद्धा आणि नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य यांच्यात संघर्षाची स्थिती तयार झाली आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असे कारण पुढे करत मुंबईतील अनेक कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सध्या मुंबईतील जवळपास ५१ कबुतरखाने अजूनही बंद असल्याचे समजते.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कबुतरखाने बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे. कबुतरांना मोठ्या प्रमाणावर दाणे टाकल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. कबुतरखाने पूर्णपणे बंद करण्याऐवजी तिथे कडक नियम लावून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. "कबुतरांना नैसर्गिक पद्धतीने अन्न मिळू द्या. दाणे टाकून त्यांना परावलंबी आणि अधू करू नका," असे देशमुख म्हणाले.
कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा देणाऱ्या निलेशचंद्र यांच्या भूमिकेवरही देशमुख यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील खऱ्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला धमकावण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असेही देशमुख यांनी बजावले.
त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीने सरकारच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवरील दंडाची रक्कम वाढवावी आणि नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी समितीने केली आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा आणि त्याला मराठी एकीकरण समितीने केलेला विरोध, या दोन्हीमुळे मुंबईतील कबुतरखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एकीकडे धार्मिक भावना आणि दुसरीकडे सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा, अशा दुहेरी पेचात हा वाद अडकल्याचे चित्र सध्या मुंबईत दिसत आहे.