जम्मू-काश्मीरमध्ये गरीब कुटुंबांना वर्षाला 6 गॅस सिलिंडर मोफत, कोणाला मिळणार फायदा?
महागाईमुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले असताना जम्मू-काश्मीर सरकारने गॅस सिलिंडरबाबत मोठा दिलासा दिला आहे.
सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य आणि विशेषतः गरीब कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा खर्चही या कुटुंबांना परवडेनासा झाला होता. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीर सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या खर्चाबाबत दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील अत्यंत गरीब कुटुंबांना आता दरवर्षी 6 LPG सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.
जम्मू आणि काश्मीर विधानसभेत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री सतीश शर्मा यांनी ही योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ 'अंत्योदय अन्न योजना' म्हणजेच AAY अंतर्गत येणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबांना मिळणार आहे. राज्य सरकारने या धोरणाला अधिकृत मंजुरी दिली असून, याबाबतचे प्रशासकीय आदेश लवकरच जारी केले जातील, असेही सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखसारख्या दुर्गम भागांत देशातील सर्वात महाग गॅस मिळतो, हे या योजनेचे महत्त्व अधोरेखित करते. या भागांत गॅसच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त असतात. लेहमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1,179 रुपये आहे, तर व्यावसायिक सिलिंडरसाठी 3,385.50 रुपये मोजावे लागतात. अशा परिस्थितीत ही मोफत सिलिंडर योजना तिथल्या गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
या योजनेचा लाभ मात्र सर्वांना मिळणार नाही. केवळ AAY रेशन कार्ड असलेल्या पात्र कुटुंबांनाच याचा फायदा घेता येईल. पैसे मिळण्याची पद्धतही आधीच ठरलेली आहे. लाभार्थ्यांना आधी स्वतःच्या पैशाने सिलिंडर विकत घ्यावा लागेल. त्यानंतर 6 मोफत सिलिंडरची संपूर्ण रक्कम आधार-संलग्न डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8.79 लाख अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.
ही घोषणा झाल्यानंतर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वर्षाला 12 मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते, मग आता फक्त 6 च का, असा सवाल भाजप आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले की, निवडणुकीतील सर्व आश्वासने पाच वर्षांच्या कार्यकाळात टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.