भोकरीच्या एसबीआय शाखेतील दरोडा: काही तासांत चौघे जेरबंद, सर्व सहा बॅगा परत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जळगाव तालुक्यातील भोकरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडला. दरोड्यात २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक रोकड लुटली गेली. पोलिसांनी काही तासांतच चार आरोपींना जेरबंद केले आणि लुटलेल्या मालाच्या सर्व सहा बॅगा हस्तगत केल्या. याशिवाय दोन देशी कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
रविवारी दुपारी सुमारे २.४५ वाजता सशस्त्र दरोडेखोर भोकरी शाखेत शिरले. त्यांनी जमिनीवर गोळी झाडून दहशत निर्माण केली. मग कर्मचारी आणि व्यवस्थापकाला बांधून त्यांच्या तोंडावर पट्ट्या लावल्या. कर्मचाऱ्यांना धमकावत त्यांनी सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाखांहून अधिक रोकड सहा बॅगांमध्ये भरली आणि दोन मोटारसायकलींवरून पळ काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मदतीसाठी धावा केला.
दरोड्याची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संभाव्य पळवाटांवर नजर वाढवण्यात आली आणि अनेक पोलीस पथकांनी मिळून शोधमोहीम राबवली. आरोपींचे वर्णन, त्यांचे कपडे आणि त्यांनी वापरलेल्या दोन मोटारसायकलींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली गेली. या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांनीही सावध राहून शोधात महत्त्वाची भूमिका बजावली.
नागरिकांच्या मदतीने एका आरोपीला पकडण्यात यश आले. त्याच्यासोबतचा दुसरा आरोपी जवळच्या शेतात पळून गेला. रस्त्यावर शोध घेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने PSI वलटे यांच्या नेतृत्वाखाली त्याचा पाठलाग सुरू ठेवला. सुमारे दीड तासाच्या शोधानंतर डीकसाई गाव परिसरात त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडच्या दोन बॅगा पोलिसांनी हस्तगत केल्या.
उरलेले दोन आरोपी मोटारसायकलीवरून धरणगावच्या दिशेने पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धरणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पथकासह चावसखेडा बोगद्याजवळ नाकाबंदी केली होती. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघांना अडवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडच्या उरलेल्या चार बॅगाही जप्त झाल्या. अशा प्रकारे काही तासांतच चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, या टोळीतील तीन आरोपींची काही वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा कारागृहात ओळख झाली होती. त्यानंतर चौथ्या आरोपीला सोबत घेऊन त्यांनी भोकरीच्या बँकेवर दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या कटाचे स्वरूप, प्रत्येक आरोपीची भूमिका आणि गुन्ह्याशी जोडलेल्या इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.
आरोपी शंकर जसक, अंकुश चव्हाण, गजानन पवार आणि अंकुश चव्हाण या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरोड्याचा कट, गुन्ह्यातील इतर सहभाग आणि आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
टोळीतील एक आरोपी महाराष्ट्र पोलीस दलातील बडतर्फ उपनिरीक्षक असल्याचे समोर आले आहे. आरोपी शंकर रमेश जसक हा २०१५ च्या ११३ व्या बॅचचा पोलीस उपनिरीक्षक होता. तो रायगड जिल्हा पोलीस दलात काम करत असताना जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल एसबीआय दरोडा प्रकरणात आरोपी झाला, म्हणून २०२३ मध्ये त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याआधी २०१८ मध्ये महाड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईशी संबंधित गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला निलंबितही करण्यात आले होते. इतर आरोपींचीही गंभीर गुन्ह्यांतील पार्श्वभूमी उघड झाली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.