इंडस टॉवर्सच्या सीएसआर उपक्रमांचा FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा, एकूण आकडा 9 कोटींवर
इंडस टॉवर्स लिमिटेडच्या सक्षम आणि प्रगती या सीएसआर कार्यक्रमांमुळे आर्थिक वर्ष 2026 मध्ये देशभरातील 3 कोटी 38 लाख 80 हजार लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी इंडस टॉवर्स लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) कार्यक्रमांतून मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या सक्षम आणि प्रगती या दोन प्रमुख सीएसआर उपक्रमांमुळे आर्थिक वर्ष 2026 मध्ये तब्बल 3 कोटी 38 लाख 80 हजार लोकांच्या जगण्यावर थेट सकारात्मक परिणाम झाला. यामुळे कंपनीच्या आतापर्यंतच्या एकूण लाभार्थ्यांचा आकडा 9 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे लाखो लोक एकमेकांशी जोडले जात असले तरी खरी प्रगती ही सगळ्यांना समान संधी मिळण्यात असते, असे कंपनीचे म्हणणे आहे. भौगोलिक स्थान, लिंग किंवा आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, प्रत्येकाला भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी लागणारी कौशल्ये, संधी आणि साधने मिळायला हवीत, या विचारातून कंपनीचे हे उपक्रम राबवले जातात.
समुदायांना डिजिटल कौशल्ये, शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी आणि टिकाऊ पायाभूत सुविधा देऊन सक्षम करणे, हा या उपक्रमांचा गाभा आहे. स्थानिक लोक, सरकारी यंत्रणा, काम राबवणारे भागीदार आणि लाभार्थी गट यांच्यासोबत मिळून काम करत, त्यांच्या नेमक्या गरजा शोधून त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. यातून समुदायात दीर्घकाळ टिकणारी आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश आहे.
याबाबत बोलताना इंडस टॉवर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचुर साह म्हणाले की, भारताचा विकासाचा प्रवास खऱ्या अर्थाने बदल घडवणारा तेव्हाच ठरेल, जेव्हा त्यात सगळ्यांचा सहभाग असेल. इंडस टॉवर्समध्ये आम्हाला वाटते की, टिकाऊ प्रगतीची सुरुवात संधींच्या समानतेतून होते, म्हणजेच प्रत्येकाला स्वतःची क्षमता पूर्ण विकसित करण्यासाठी सारख्याच संधी, साधने आणि पाठिंबा मिळायला हवा. सीएसआर कार्यक्रमांमधून आम्ही समुदायांना ज्ञान, कौशल्य आणि संधी देऊन सक्षम करत आहोत, जेणेकरून त्यांना भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीत खरा सहभाग नोंदवता येईल, असे ते पुढे म्हणाले.
समुदाय, अंमलबजावणी करणारे भागीदार आणि सरकारी संस्था यांच्यासोबत काम करून असा दीर्घकाळ टिकणारा परिणाम घडवायचा आहे, ज्यामुळे लवचिकता वाढेल, सर्वांना सामावून घेतले जाईल आणि देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असेही साह यांनी सांगितले.
हे उपक्रम डिजिटल इंडिया, स्किल इंडिया मिशन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, पीएम ई-विद्या आणि आकांक्षी जिल्हा कार्यक्रम यांसारख्या सरकारच्या प्रमुख योजनांशी जुळणारे आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांतही यातून योगदान मिळते.
गेल्या काही वर्षांत कंपनीने देशातील मागास भागातील विकासाची महत्त्वाची आव्हाने सोडवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. 2030 पर्यंत सुमारे 15 कोटी लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. देशभरातील आपले विस्तृत टॉवर नेटवर्क, तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक परिस्थितीची जाण यांच्या जोरावर, डिजिटल समावेशकता, मनुष्यबळ विकास, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि समान आर्थिक विकास या क्षेत्रांत काम सुरू ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे.