हिमाचलमधील खूनप्रकरणी बिहारचे चौघे जळगावात ताब्यात; मोबाईल विकायला उतरले होते
हिमाचल प्रदेशातील खूनप्रकरणी चार आरोपींना शनिपेठ पोलिसांनी जळगावात ताब्यात घेतले आहे.
हिमाचल प्रदेशात झालेल्या एका खुनाच्या प्रकरणातील चार आरोपींचा मुंबईकडे जाणारा प्रवास जळगावातच थांबला. शनिपेठ पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे. प्रवासासाठी पैसे संपले म्हणून मोबाईल विकण्यासाठी हे आरोपी जळगावात उतरले होते.
या प्रकरणात हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खुनाचा गुन्हा एफआयआर क्रमांक ८२/२०२६ अन्वये, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झाला आहे. हिमाचल पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुकेश कुमार आणि आरोपी एकत्र दारू पीत होते. त्या वेळी बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हल्ला करून मुकेश कुमार यांचा खून केल्याचे हिमाचल पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर हे आरोपी सकाळी सुमारे ११ वाजता किसंपूर येथून निघाले. अंबाला येथे पोहोचल्यावर त्यांनी दुपारी ४.३० वाजता मुंबई एक्स्प्रेस पकडली आणि मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र प्रवासात खाण्यासाठीही पैसे उरले नाहीत. मोबाईल विकून पैसे उभे करण्यासाठी ते जळगावात उतरले. याच दरम्यान पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाले.
हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना आरोपी शनिपेठ हद्दीत असल्याचे कळवले. जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने सूचना दिल्या आणि शोधमोहीम राबवली. आरोपींच्या हालचालींचा माग काढत पथकाने चौघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले चौघेही बिहारचे आहेत. त्यांपैकी चंदन कुमार आणि रोशन गोगल मुखिया हे कुतुबपूर, पोलीस ठाणे सकरा, जि. मुझफ्फरपूर येथील रहिवासी आहेत. संतोष कुमार हा बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर येथील आहे, तर अजित कुमार जोगा मेहतो हा पंडरक, जि. पाटणा येथील आहे.
चौघांना ताब्यात घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. आरोपींना हिमाचल पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया होणार आहे.
या कारवाईत पोहेकों विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाचा सहभाग होता.
दरम्यान, जळगाव शहरात वाळू माफिया, जुगार, मटका, गावठी दारू यांसारखे अवैध धंदे अनेक दिवसांपासून खूप वाढले होते. त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टीम नेमण्यात आली. या टीमने एकाच दिवसात ९ ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात १० आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ४७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.