आम्हाला वेळ नाही, तुम्हीच उरकून घ्या... बापाच्या अंत्यसंस्काराला मुलाचे शहारे आणणारे शब्द
छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्धांगवायूने त्रस्त वृद्धाचा वृद्धाश्रमात मृत्यू झाल्यानंतर मुलाने अंत्यसंस्कारासाठी येण्यास नकार दिला. पोलिसांत तक्रार करण्याची तंबी मिळाल्यावरच मुलगा वृद्धाश्रमात हजर झाला.
छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक आणि तितकीच वेदनादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात अर्धांगवायूने त्रस्त अवस्थेत एक ८० वर्षीय वृद्ध आढळून आला होता. त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर या वृद्धाची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात आली. वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा तुपे यांनी त्या वृद्धाच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना या वृद्धाचा मुलगा व सून यांचा ठावठिकाणा मिळाला.
कुटुंबीयांचा पत्ता मिळाल्यानंतर तुपे यांनी मुलाशी संपर्क साधला आणि वडिलांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र घरात लग्नकार्य असल्याने जागा अपुरी पडेल, असे कारण मुलाने दिले. लग्न होऊ द्या, त्यानंतर बघू, असे सांगत मुलाने वडिलांना वृद्धाश्रमातच ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात वृद्धाचा अर्धांगवायूचा आजार अधिकच बळावत गेला. अखेर रविवारी सकाळी सात वाजता या वृद्धाचे निधन झाले.
वडिलांच्या निधनाची बातमी तुपे यांनी लगेच मुलाला कळवली आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र मुलाकडून मिळालेले उत्तर धक्कादायक होते. आम्हाला वेळ नाही, आम्हाला जमणार नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या, असे उत्तर मुलाने दिल्याचे समजते. तुपे यांनी वारंवार विनंती करूनही मुलाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला.
पोलिसांत तक्रार करण्याची व त्यानंतर होणाऱ्या कायदेशीर कारवाईची शक्यता समजताच मुलाची भूमिका अचानक बदलली. काही वेळातच तो वृद्धाश्रमात पोहोचला आणि तेथे त्याने वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला. ज्या वडिलांनी आयुष्यभर मुलाचा सांभाळ केला, त्यांच्यासाठी अखेरच्या दिवसांत वृद्धाश्रमाचाच आधार ठरला. मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी मुलाच्या येण्याची वाट पाहावी लागली, ही या घटनेतील अत्यंत दुर्दैवी बाब ठरली आहे.
या घटनेने वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्थितीबाबत आणि कुटुंबीयांकडून त्यांच्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांच्या इशाऱ्यानंतरच मुलाला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली, यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते.