मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावर अस्वलाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू, तळोधीत घटना

ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी परिसरात रेल्वेच्या धडकेत मादी अस्वल ठार, कुंपणाची मागणी जोर धरू लागली.

गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावर अस्वलाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू, तळोधीत घटना
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावर पुन्हा एका वन्यजीवाचा बळी गेला आहे. ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमध्ये रेल्वेच्या धडकेत एका पूर्ण वाढ झालेल्या मादी अस्वलाचा मृत्यू झाला आहे. रुळांलगत काम करणाऱ्या मजुरांना अस्वल मृतावस्थेत आढळून आले, त्यानंतर त्यांनी लगेच तळोधी वनविभागाला ही घटना कळवली.

माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी आणि जीवशास्त्रज्ञ राकेश अहुजा यांच्या सूचनेनुसार क्षेत्र सहाय्यक अरविंद मने आणि वनरक्षक बांगर हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी वन्यजीव अभ्यासक तथा स्वाब (SWAB) संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव दलप्रमुख जीवेश सयाम हेदेखील उपस्थित होते. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सावरगाव येथील वन आगारात हलवण्यात आला.

पशुसंवर्धन नागभीडचे सहाय्यक आयुक्त डॉ. सतीश तांबे, तळोधीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे आणि चंद्रपूर टीटीसीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोचलवार यांनी शवविच्छेदन केले. यात रेल्वेच्या जोरदार धडकेमुळे अस्वलाच्या बरगड्या तुटल्या होत्या आणि शरीराच्या अंतर्गत भागांना गंभीर इजा झाल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळेच अस्वलाचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सावरगाव वन आगारात उपस्थित वनाधिकारी, स्वाब संस्थेचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार अस्वलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोंदिया-बल्लारशाह हा रेल्वे मार्ग नवेगाव-नागझिरा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि ब्रह्मपुरी वनविभागाच्या सलग वनक्षेत्रातून जातो. त्यामुळे दरवर्षी या मार्गावरून भरधाव धावणाऱ्या गाड्यांच्या धडकेत वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, नीलगाय, सांबर आणि चितळ यांसारख्या अनेक वन्यजीवांना जीव गमवावा लागतो.

रेल्वे विभागाकडून या समस्येवर आवश्यक त्या उपाययोजना वारंवार दुर्लक्षित होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळांच्या दुतर्फा मजबूत जाळीचे कुंपण उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्वाब संस्थेने केली आहे. प्रशासनाने त्वरित योग्य पावले न उचलल्यास वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ