नागपुरातील गौ विज्ञान केंद्राला 'गो टुरिझम'चा दर्जा, भागवत यांच्या हस्ते प्रमाणपत्र
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गौ विज्ञान केंद्राला 'गो टुरिझम'चा दर्जा देण्यात आला आहे. या दर्जाचे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते केंद्राचे पद्मेश गुप्ता यांना प्रदान करण्यात आले. त्या वेळी भागवत बोलत होते.
भागवत म्हणाले, संघाचे एक गीत आहे, बोलणे जाते विरून, सत्कर्म होतात अमर. गौ विज्ञान केंद्र आणि विश्व हिंदू परिषद जे काम करत आहेत, ते मोलाचे आहेच. मात्र समाजाची गरज पाहता गौ-सेवेचे हे कार्य पुरेसे नाही. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि धर्माच्या सुरक्षिततेसाठी हे कार्य करणे आम्हा सर्वांना आवश्यक आहे.
आपला समाज उत्सवप्रिय आहे आणि उत्सवात जोशात सहभागी होतो, असे भागवत यांनी सांगितले. मात्र जे केले पाहिजे ते मी नाही, दुसऱ्याने करावे, अशी समाजाची अपेक्षा असते. धर्माचे रक्षण करण्यासाठी, धर्म स्थापन करण्यासाठी देवाने अवतार घ्यावा, आम्ही ते करणार नाही, आमची नोकरी आहे, आम्हाला इतर कामे आहेत, अशीही अपेक्षा असते. पण जेव्हा धर्मरक्षणाचे कार्य झाले, तेव्हा संपूर्ण समाजाचे प्रयत्न त्यात लागले होते.
काय होईल, माझे काय होईल, याची काळजी न करता पूर्ण शक्तीने देश आणि समाजासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जे काही मी कमावतो त्यातील काही योगदान मी समाजासाठी देणे लागतो, असे झाले तरच आपण आपल्या महापुरुषांच्या पावलांवर चालत आहोत हे सिद्ध होईल, असेही सरसंघचालक म्हणाले.
राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी सांगितले की, देवलापार क्षेत्र अभयारण्य आणि तिथल्या वाघांसाठी प्रसिद्ध होतेच. आता तिथल्या गौ विज्ञान केंद्रामुळे आणि तिथल्या संशोधनाची माहिती घेण्यासाठी लोक येतील. महाराष्ट्र सरकारने देवलापार येथील गौ विज्ञान केंद्राला गौ-तीर्थाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात तिथल्या संशोधनासाठी सरकारी निधी देणे शक्य होणार आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता विविध जिल्ह्यांसाठी असलेल्या CFR जमिनींवर चारा लागवड करण्याचा विचार आहे, असेही जयस्वाल यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी अशोक सिंघल यांची आठवण काढली. ते म्हणाले, अशोक सिंघल यांची आज 1990 ची आठवण येते. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यांनी अयोध्येत आणि अयोध्येकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर अनेक अडथळे आणि अडचणी निर्माण केल्या होत्या. मात्र हिंदू समाजाने ते आव्हान स्वीकारले. अयोध्येतील लोकांनी कारसेवकांना सहकार्य करत आश्रय दिला.
आलोक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, अशोक सिंघल मोटारसायकलवर बसून तिथे पोहोचले. त्यांना डोक्याला वीट लागली. तरीही त्याची काळजी न करता ते कारसेवेत कायम राहिले. जखमी अशोक सिंघल यांनी त्या दिवशी हिंदू समाजाला शौर्य दिले आणि विजयाचा भाव दिला, असे आलोक कुमार यांनी या वेळी सांगितले.