एसटी बसस्थानके, आगारांतील स्वच्छता निकृष्ट, नवी निविदा काढण्याची बरगे यांची मागणी
एसटीच्या बसस्थानकांवर स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी विद्यमान निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. यावर काम सुधारत नसेल तर संबंधित संस्थेला फक्त नोटीस बजावून थांबू नये, तर विद्यमान स्वच्छता निविदाच रद्द करून नव्याने निविदा काढावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटीच्या स्वच्छतेबाबत सतत तक्रारी येत असल्याने बसस्थानक परिसर, कर्मचारी विश्रांतीगृहे, स्थानकांवरील स्वच्छतागृहे आणि बसेसच्या स्वच्छतेचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. मात्र अनेक विभागांमध्ये स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा राखला जात नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेषतः मोठ्या बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे बरगे यांनी निदर्शनास आणून दिले.
नवे कंत्राट देऊन साधारण चार महिने उलटले, तरी स्वच्छतेत काहीच सुधारणा झाली नाही आणि तक्रारी वाढतच गेल्या. यावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही नाराजी व्यक्त करत प्रशासनाला स्पष्ट कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही संबंधित अधिकारी जबाबदारीने काम करत नसतील किंवा कंत्राटदाराला पाठीशी घालत असतील, तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे बरगे म्हणाले. स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या संस्थेच्या कामकाजात सुधारणा होत नसेल, तर करार रद्द करून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बरगे यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीपुरती मर्यादित बाब नसून ती त्यांच्या आरोग्याशी जोडलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. दररोज हजारो प्रवासी एसटी स्थानकांवर ये-जा करतात, त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांची स्वच्छतागृहे तसेच बसस्थानक परिसर चोवीस तास स्वच्छ राहावा यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि प्रभावी यंत्रणा असणे गरजेचे आहे. मात्र सध्या तसे चित्र दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटदाराने करारातील अटींची पूर्तता केलेली नाही आणि कामाचा दर्जाही समाधानकारक नाही. वारंवार तक्रारी येत असतील, तर केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन कंत्राटदाराला पाठीशी घालण्यापेक्षा कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे बरगे यांनी स्पष्ट केले. सध्याची निविदा रद्द करून नव्याने निविदा काढताना मनुष्यबळ, कामाची गुणवत्ता, नियमित तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या अटी अधिक कडक कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.