वेळापत्रकावरून प्रणॉय संतापला, एशियन गेम्समध्ये एकाच दिवशी दोन सामने खेळल्याने नाराजी
एशियन गेम्स 2026 मधील सामन्यांच्या वेळापत्रकावर भारतीय बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉयने नाराजी व्यक्त केली आहे.
भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय याने एशियन गेम्स 2026 मधील सामन्यांचे वेळापत्रक कसे मांडले जात आहे, यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंना पहिला आणि दुसरा सामना यामध्ये पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचे त्याचे स्पष्ट म्हणणे आहे.
ही नाराजी अशा वेळी समोर आली, जेव्हा भारताचे युवा शटलर आयुष शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांना शनिवारी एकाच दिवशी दोन सामने खेळावे लागले. संध्याकाळी होणाऱ्या राउंड ऑफ 16 च्या सामन्याच्या अवघ्या काही तास आधीच त्यांचा दुसरा सामना संपला होता. प्रणॉयच्या मते इतक्या कमी अंतराने सलग दुसरा सामना खेळल्यास खेळाडूला शारीरिक आणि मानसिक पातळीवर मोठे आव्हान पेलावे लागते. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना रिकव्हरीसाठी आणि पुढच्या सामन्याच्या तयारीसाठी योग्य वेळ मिळायलाच हवा, असे त्याने सुचवले असून अशा घाईगडबडीच्या वेळापत्रकाचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवरही होऊ शकतो, याकडे त्याने लक्ष वेधले.
प्रणॉयने आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट टाकत म्हटले की, यंदाच्या एशियन गेम्सचे वेळापत्रक साउथ झोन चॅम्पियनशीपसारखे भासत आहे. त्याने नमूद केले की सांघिक पदक वितरण सोहळा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होता, त्यामुळे अनेक खेळाडूंचे पुढचे सामने दुसऱ्या दिवशीच होते. आता मात्र एकाच दिवशी दोन सामने ठेवण्यात आले असून हा निव्वळ वेडेपणा असल्याचे तो म्हणाला.
ही चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा आयुष आणि उन्नती दोघेही राउंड ऑफ 16 मध्ये पोहोचले आणि त्यांना आपापले पुढचे एकेरी सामने खेळण्यासाठी त्याच संध्याकाळी पुन्हा कोर्टवर उतरावे लागणार होते. आयुषने कझाकिस्तानच्या मखसुत ताजीबुल्लायेवचा 21-7, 21-7 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर उन्नतीने मलेशियाच्या वाँग लिंग चिंगला 21-14, 20-22, 21-19 अशा तीन सेटच्या चुरशीच्या लढतीत हरवले. उन्नतीला हा विजय मिळवण्यासाठी तब्बल 79 मिनिटे लागली.
दोघांचेही हे सामने सकाळच्या सत्रात होते, त्यामुळे त्यांना लगेच शनिवारी संध्याकाळच्या सत्रातच पुढचे सामने खेळायचे आहेत. याचा अर्थ, दोन्ही स्टार शटलरना आपापल्या प्री-क्वॉर्टर फायनल सामन्याआधी स्वतःला सावरण्यासाठी वेळच मिळणार नाही.
जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या आयुषने ताजीबुल्लायेवविरुद्धच्या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले आणि प्रतिस्पर्ध्याला लय पकडण्याची कोणतीही संधी दिली नाही. सरळ सेटमध्ये विजय मिळवणाऱ्या आयुषचा पुढील सामना चिनी ताइपेच्या चाउ टिएन-चेनविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानावरील वाँगविरुद्ध उन्नतीला अतिशय चुरशीचा सामना खेळावा लागला. उन्नतीने पहिला सेट 21-14 असा जिंकला, त्यानंतर वाँगने पुनरागमन करत दुसरा सेट 22-20 असा आपल्या नावे केला, मात्र तिसरा सेट जिंकत उन्नतीने हा सामना अखेर आपल्या खिशात घातला.