एशियन गेम्स: पुरुष बॅडमिंटन संघाची क्वॉर्टर फायनलमध्ये धडक; तुल्यबळ बांगलादेशला 3-0 ने नमवले
लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने बांगलादेशला एकतर्फी सामन्यात 3-0 असे नमवत क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.
एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने दमदार सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने एकतर्फी खेळ करत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदाम्बी श्रीकांत या तिघांनीही आपापल्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात भारताचाच दबदबा राहिला आणि या विजयासह भारतीय संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. क्वॉर्टर फायनलमध्ये भारतीय संघ जिंकला, तर भारताचे पदक निश्चित होणार आहे.
सामन्याची सुरुवात लक्ष्य सेनने केली आणि त्याने पहिल्याच फेरीपासून बांगलादेशच्या अयमान इब्न झमानवर वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. एकापाठोपाठ एक दमदार शॉट्स खेळत त्याने हा सेट तब्बल 21-4 अशा मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्येही त्याने हीच लय कायम ठेवत 21-12 असा विजय मिळवला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. लक्ष्यच्या जबरदस्त स्मॅशपुढे झमानला टिकाव धरता आला नाही.
दुसऱ्या सामन्यात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये शानदार कामगिरी करून चर्चेत आलेल्या आयुष शेट्टीने बाजी मारली. बांगलादेशच्या गौरव सिंघावर आयुष पूर्णतः वरचढ ठरला आणि त्याने सिंघाला पुनरागमन करण्याची अजिबात संधी दिली नाही. पहिला सेट आयुषने 21-4 असा जिंकला, तर दुसरा सेट 21-13 असा आपल्या नावावर केला. यामुळे भारताची आघाडी 2-0 अशी झाली आणि सामना भारताच्या बाजूने झुकला.
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात किदाम्बी श्रीकांतने सर्वोत्तम खेळ केला. त्याचा सामना बांगलादेशच्या जुमार अल-अमीनविरुद्ध होता. पहिल्या सेटमध्ये श्रीकांत काही काळ भरकटल्यासारखा वाटला, पण त्याने लगेच स्वतःला सावरले आणि हा सेट 21-15 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने जुमारला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही आणि 21-10 असा सेट जिंकत बांगलादेशच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.
या तीनही सामन्यांतील विजयांमुळे भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने बांगलादेशला 3-0 असे नमवले आणि क्वॉर्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात आता भारताचा सामना मंगळवारी जपानविरुद्ध होणार आहे. भारतीय पुरुष संघाने या सामन्यात विजय मिळवला, तर त्यांचे पदक निश्चित होणार आहे.