Asian Games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय कबड्डी संघाने यजमान जपानला ४९-२३ अशा मोठ्या फरकाने हरवत एकतर्फी विजय मिळवला.
जपानमध्ये सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ सुरू आहेत आणि या स्पर्धेत भारतीय संघांची कामगिरी चांगली सुरू आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू पदकं मिळवत असतानाच याच स्पर्धेत भारताच्या कबड्डी संघाने देखील दमदार सुरुवात केली आहे. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने यजमान जपानला ४९-२३ अशा मोठ्या फरकाने हरवत एकतर्फी विजय मिळवला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डी प्रकारात भारतीय संघाने अशा प्रकारे दमदार आणि शानदार सुरुवात केली आहे.
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय खेळाडूंनी मैदानावर पूर्ण वर्चस्व ठेवलं होतं. आक्रमक चढाई आणि भक्कम बचाव यांच्या उत्कृष्ट जोडीच्या बळावर भारतीय संघाने जपानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. सामना सुरू झाल्यापासूनच जपानचा संघ दबावाखाली राहिला आणि त्यातून बाहेर पडण्याची एकही संधी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये दिसले आणि संघाने एकतर्फी विजय नोंदवला.
जपानचा भक्कम मानला जाणारा बचाव वारंवार भेदत भारतीय चढाईपटूंनी एकापाठोपाठ एक गुण मिळवले. भारतीय रेडर्सची हालचाल आणि वेग यांचा अंदाज बांधणं जपानच्या बचावपटूंना कठीण जात होतं, त्यामुळे त्यांना वारंवार गुण गमवावे लागले. फक्त आक्रमणातच नाही, तर बचावातही भारताचं पारडं जड राहिलं. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय बचावपटूंनी दाखवलेल्या पकडीच्या रणनीतीमुळे जपानच्या संघाला गुण मिळवण्यासाठी झगडावं लागलं आणि त्यांची आक्रमणं वारंवार अडवली गेली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय रेडर्सनी जपानच्या बचावावर सातत्याने दडपण ठेवलं आणि हीच रणनीती प्रभावी ठरली. स्टार रेडर आशू मलिकने अप्रतिम कौशल्य दाखवत सुपर रेड केली आणि एकाच चढाईत जपानच्या तब्बल तीन खेळाडूंना बाद केलं. या सुपर रेडमुळे भारताला मोठा फायदा झाला आणि जपानच्या संघाला मोठा धक्का बसला. यामुळे पहिल्या हाफअखेर भारताने ३१-९ अशी भक्कम आणि एकतर्फी आघाडी घेतली. उत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताने पहिल्याच हाफमध्ये जपानच्या संपूर्ण संघाला दोन वेळा ऑल-आऊट केलं.
दुसऱ्या हाफमध्ये भारताने आपल्या राखीव बाकावरील दिग्गज खेळाडूंना संधी दिली. मैदानावर उतरताच अर्जुन देशवालने पहिल्याच चढाईत सुरेख गुण मिळवत संघाचं खातं पुढे नेलं. त्यानंतर पवन सहरावत आणि असलम इनामदार यांनीही चपळ हालचालींनी जपानच्या बचावावर दडपण कायम ठेवलं. या तिघांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात तिसऱ्यांदा जपानला ऑल-आऊटची नामुष्की सहन करायला लावली, ज्यामुळे भारताची आघाडी आणखी भक्कम झाली आणि संघाने अखेरपर्यंत हे वर्चस्व कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केलं.