आशियाई क्रीडा स्पर्धा 2026: पुष्पा राणाच्या टीमने इराणला हरवत जिंकले महिला कबड्डीतील सुवर्णपदक
अंतिम सामन्यात भारताने इराणचा 37-34 ने पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक पटकावले.
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. यावेळी हे यश मिळवले आहे भारताच्या महिला कबड्डी टीमने. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.
अंतिम सामन्यात भारताने इराणला 37-34 अशा फरकाने नमवले. सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने 22-16 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात इराणने जबरदस्त पुनरागमन केले आणि एका क्षणी गुणसंख्या 27-26 अशी झाली होती. अशा टफ स्थितीतही भारतीय मुलींनी संयम सोडला नाही आणि जोरदार पुनरागमन करत देशासाठी सुवर्णपदक खेचून आणले. अंतिम सामन्यात संजू देवीने दमदार कामगिरी करत एक शानदार चढाई केली आणि त्यामुळेच भारताला विजय मिळाला.
सुरुवातीपासूनच भारतीय टीम सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. भारतीय संघाने या स्पर्धेत आपले सगळे सामने जिंकत अपराजित राहण्याचा मान मिळवला. संघाच्या प्रशिक्षकांनी आधीच सांगितले होते की कबड्डी हा भारताचा खेळ आहे, त्याचा उगमही भारतातलाच आहे आणि या खेळात भारताला कोणीही हरवू शकत नाही. सुवर्णपदक जिंकून भारतीय टीमने प्रशिक्षकांचे हे शब्द खरे करून दाखवले.
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता ही कामगिरी केली. गटातील तिन्ही सामने जिंकल्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यातही भारताने दमदार विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशवर 42-21 असा विजय मिळवत केली होती. त्यानंतर इराणविरुद्ध 37-23 असा विजय मिळाला. पुढे जपानविरुद्ध 50-25 असा दणदणीत विजय मिळवत भारताने 'अ' गटात अव्वल स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत नेपाळला 48-24 ने हरवत भारताने अंतिम फेरी गाठली. आणि अंतिम सामन्यात इराणला 37-34 ने नमवत सुवर्णपदकावर कब्जा केला.
कबड्डीत भारताचे वर्चस्व आजही कायम आहे. 1990 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश झाल्यापासून भारतीय पुरुष संघाने आठ सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदके जिंकली आहेत. फक्त 2018 मध्ये संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते, तेव्हा भारताची सुवर्णपदकांची मालिका खंडित झाली होती.
भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा महिला कबड्डी संघ असा आहे: पुष्पा राणा (कर्णधार), रितू नेगी, ज्योती ठाकूर, पूजा हथवाला, सोनाली विष्णू शिंगटे, मनीषा कुमारी, पिंकी रॉय, रितू शेओरन, भावना देवी ठाकूर, निकिता, राज राणी आणि संजू देवी.