बंगाली भाषा दिवस : २० सप्टेंबरला 'बंगाली भाषा दिवस' घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी; जगभरात हा दिवस 'या'
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पश्चिम बंगाल सरकारकडे मागणी केली आहे. दारिभीट इथं झालेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या दोन तरुणांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी २० सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे बंगाली भाषा दिवस म्हणून जाहीर करावा, अशी त्यांची भूमिका आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) पश्चिम बंगाल सरकारसमोर एक नवी मागणी मांडली आहे. दरवर्षी २० सप्टेंबर हा दिवस राज्यात 'बंगाली भाषा दिवस' म्हणून अधिकृतपणे साजरा केला जावा, अशी त्यांची भूमिका आहे. या मागणीमागचं कारण म्हणजे उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील दारिभीट इथं २० सप्टेंबर २०१८ रोजी घडलेली घटना, ज्यात राजेश सरकार आणि तपस बर्मन या दोन तरुणांचा जीव गेला होता. या दोघांच्या स्मृतीला कायमस्वरूपी उजाळा मिळावा, हा या मागणीमागचा हेतू असल्याचं एबीव्हीपीनं म्हटलं आहे.
त्या दिवशी दारिभीटमध्ये झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात राजेश सरकार व तपस बर्मन यांचा मृत्यू झाला होता. एबीव्हीपीच्या म्हणण्यानुसार, हे दोघेही मातृभाषेचा हक्क आणि तिचं संरक्षण या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होते आणि त्याच आंदोलनादरम्यान त्यांना प्राण गमवावे लागले. या घटनेचं स्मरण कायम राहावं आणि तिला अधिकृत मान्यता मिळावी, यासाठीच २० सप्टेंबर हा दिवस भाषा दिवस म्हणून जाहीर करावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. याच आधारावर एबीव्हीपीनं पश्चिम बंगाल सरकारकडे ही मागणी नोंदवली आहे.
या मागणीमुळे पश्चिम बंगालमध्ये प्रांतिक भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण जगभरात बंगाली भाषा दिवस हा २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, हे एबीव्हीपीनंही मान्य केलं आहे. मात्र त्यांच्या मते या तारखेची ऐतिहासिक पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यावेळचा पूर्व पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश इथल्या भाषिक आंदोलनाशी २१ फेब्रुवारी ही तारीख जोडलेली आहे, असं एबीव्हीपीचं म्हणणं आहे. एबीव्हीपीचा युक्तिवाद असा आहे की, रवींद्रनाथ टागोर आणि काजी नजरुल इस्लाम यांच्यासारख्या मोठ्या साहित्यिकांचा वारसा लाभलेल्या पश्चिम बंगालमध्येही मातृभाषेसाठी झालेल्या दारिभीट घटनेला वेगळी आणि योग्य दखल मिळायला हवी. या घटनेला स्वतंत्र आणि अधिकृत ओळख मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे.
भाषा दिवसाच्या मागणीसोबतच एबीव्हीपीनं दारिभीट घटनेची निष्पक्ष आणि तातडीनं चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. या घटनेमागचं खरं सत्य समोर यावं, यात जबाबदार असलेल्या लोकांची भूमिका उघड व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करत अटक करण्यात यावी, असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
याच मागणीला पाठिंबा देत एबीव्हीपीनं रविवारी, २० सप्टेंबरला पश्चिम बंगालमधील अनेक कॉलेजांमध्ये बंगाली भाषा दिवस साजरा केला. या कार्यक्रमांमध्ये राजेश सरकार आणि तपस बर्मन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.