शेतकऱ्यांसाठी श्रीकांत शिंदेंचा निर्णय, डोंबिवलीतील रासरंग दांडिया उत्सव यंदा रद्द
पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील रासरंग दांडिया उत्सव रद्द करून तो निधी शेतकरी मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाने यंदा नीट साथ दिली नाही, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकरी कुटुंबे संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत दरवर्षी होणारा भव्य 'रासरंग' दांडिया उत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवासाठी दरवर्षी जो खर्च केला जातो, तो यंदा उत्सवावर न करता संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. ही माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर हा दांडिया उत्सव मोठ्या थाटात आयोजित केला जातो. डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातून हजारो नागरिक दरवर्षी या उत्सवात सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून रासरंग हे डोंबिवलीतील नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण राहिले असून दांडिया आवडणाऱ्या रसिकांमध्ये या उत्सवाची खास ओढ असते.
पण यंदा राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. अनियमित पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाले असून, वर्षभर राबून उभी केलेली पिके डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधारच हिरावला गेला आहे. हे नुकसान केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून त्याचा फटका संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसतो, याची गंभीर दखल घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला.
शेतकरी संकटात असताना तेवढ्याच थाटामाटात उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका या निर्णयामागे आहे. उत्सवासाठी राखलेला निधी यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिला जाणार असून, उत्सवातून जो आनंद मिळतो तो यंदा शेतकऱ्यांना मदत करून मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी नुकतीच अकोला, बुलढाणा या भागांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. संकटग्रस्त कुटुंबांना मदत करताना त्यांच्या मुलांचे शिक्षण, मुला-मुलींचे लग्न आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही आधार देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याच सामाजिक जबाबदारीतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासरंग उत्सवाबाबत हा निर्णय घेतला. दरवर्षी उत्सवाच्या आयोजनासाठी लागणारा निधी यंदा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवला जाणार असून, नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरीव निधीही दिला जाणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात मदत अधिक परिणामकारकपणे पोहोचवता येईल, याचे नियोजन सध्या सुरू आहे. मदत खरोखर गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचावी यासाठी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन त्यानुसार मदतीचे स्वरूप ठरवले जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदा रासरंगचा मोठा जल्लोष होणार नसला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा मात्र कायम राहणार आहे. साध्या पद्धतीने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाणार आहे. उत्सव दरवर्षी साजरे होतच राहतील, पण संकटाच्या काळात अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली असताना त्याला प्राधान्य देणे अधिक गरजेचे आहे, अशी भावना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. यंदा रासरंगमधून होणारा जल्लोष बाजूला ठेवून शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा आधार आहे, त्यामुळे तो संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही समाज म्हणून सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा रासरंग दांडिया उत्सव रद्द करून शेतकरी बांधवांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.