मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

राष्ट्रवादीचे सात नेते दिल्लीत अमित शाह यांना भेटले; सुनेत्रा पवार उपस्थित नव्हत्या

राष्ट्रवादीचे सात नेते दिल्लीत अमित शाह यांना भेटले; सुनेत्रा पवार उपस्थित नव्हत्या छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

राष्ट्रवादीच्या सात ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पक्षाचे प्रवक्ते उमेश पवार यांनी ही पूर्वनियोजित बैठक असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल झाला आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या भेटीला उपस्थित नव्हते.

भेट घेणाऱ्यांमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. पक्षातील इतके महत्त्वाचे नेते एकाच वेळी शाह यांच्याकडे गेल्याने या भेटीमागचं नेमकं कारण काय, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या भेटीची पार्श्वभूमी अशी की, विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला अपयश आलं. त्यानंतर पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या नेतृत्वावरही पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकीतील अपयशानंतर सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली होती. पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीकडे फक्त औपचारिक भेट म्हणून पाहिलं जात नाहीये.

सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची अनुपस्थिती ही या भेटीतली सर्वांत लक्षवेधी बाब ठरली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शाह यांना भेटत असताना राष्ट्रीय अध्यक्षाच बैठकीत नव्हत्या, म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीत नेतृत्वाच्या पातळीवर काही वेगळंच समीकरण तयार होत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. ही बैठक पूर्वनियोजित होती, असं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या काळातील काही विषय आणि राज्यातील काही महत्त्वाचे प्रश्न यांच्या संदर्भात ही बैठक घेण्यात आली होती, असं उमेश पवार यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीबद्दलही उमेश पवार यांनी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं एक शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना कळवलं होतं. त्यासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली होती. म्हणजेच नेत्यांची ही भेट सुनेत्रा पवार यांच्या आदेशानेच झाली, असं उमेश पवार यांनी सांगितलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाह यांच्यासोबतच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली. याबाबत निवेदनही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुढे काय घडतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ