FDA ची पुन्हा धडक कारवाई; लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
धुळ्यात एफडीएने लक्झरी बस अडवून त्यातून 5,385 किलो मावा जप्त केला असून त्याची किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये इतकी आहे.
राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) सुरू असलेल्या कारवाईची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएचे आयुक्तपद स्वीकारल्यापासून विभागाने राज्यभर धडक कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईंमध्ये भेसळयुक्त पदार्थ, हॉटेलमधील अस्वच्छता आणि अन्न-औषध विषयाशी संबंधित सर्व बाबींवर विभागाने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. आता धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली असून, एका लक्झरी बसमधून वाहतूक होत असलेला खवा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या खव्याची किंमत तब्बल 16 लाख 52 हजार रुपये इतकी आहे.
सध्या विविध सण जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या या कारवाईला अधिकच वेग देण्यात आला आहे. याच अंतर्गत धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने एफडीएने एक लक्झरी बस अडवली आणि त्यातून तब्बल 5,385 किलो मावा (खवा) जप्त केला. या साठ्याची एकूण किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये इतकी आहे. भेसळीच्या संशयावरून हा साठा जप्त करण्यात आला असून सध्या तो कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस अहमदाबादहून अकोल्याकडे निघाली होती. अशोक लेलँड वेलकम या लक्झरी बसचा क्रमांक MP-44-ZF-7214 असा आहे. या बसमधून मिठाई बनवण्यासाठी लागणारा मावा वाहतूक केला जात असल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सहकार्याने एफडीएच्या पथकाने मोराणे हद्दीतील साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ ही बस थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे वाहन टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे आणण्यात आले, जिथे सध्या हा साठा सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या साठ्यात प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदि), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझर्ट (नंदि) आणि प्रीमियम डेझर्ट (मीरा) या विविध कंपन्यांच्या उत्पादनांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वाहनातून विविध ब्रँडचा मावा वाहतूक होत असल्याने एफडीएच्या पथकाला भेसळीचा संशय आला आणि हा संपूर्ण साठा जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या कारवाईनंतर विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.