चंद्रपुरात महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे 'ग्रामसमृद्धी' पोर्टल, ऑनलाइन अर्जाची सोय
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ग्रामीण भागातील महिला व युवतींसाठी एक नवे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे नाव आहे ग्रामसमृद्धी. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या पोर्टलमागचा हेतू आहे.
या पोर्टलवर विविध योजनांची सविस्तर माहिती, त्यासाठीचे पात्रता निकष आणि लागणारी कागदपत्रे यांची यादी दिलेली आहे. याशिवाय लाभार्थ्यांना याच पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पात्र असलेल्या महिलांनी या योजनांचा लाभ जरूर घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील महिला व युवतींना कौशल्य प्रशिक्षणातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत सहजपणे पोहोचाव्यात, यासाठीच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले.
महिला व युवतींच्या कौशल्य विकासाला चालना देणे, रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारी कौशल्ये त्यांच्यात विकसित करणे आणि त्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन मिळवून देणे, हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच इयत्ता दहावी व बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना अर्थसहाय्य देण्याच्या योजनांचाही यात समावेश आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिला व युवतींना त्यांच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि उपलब्ध संधींनुसार वेगवेगळ्या व्यवसाय व कौशल्याधारित प्रशिक्षणांचे पर्याय दिले जाणार आहेत. या प्रशिक्षणातून व्यवसायासाठी लागणारी कौशल्ये तर विकसित होतीलच, शिवाय स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही दिले जाणार आहे.
या योजनांसाठीची अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि जलद व्हावी, यासाठी gramsamruddhi.in/wcdscheme हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर वेगवेगळ्या योजनांची माहिती, पात्रता निकष, लागणारी कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा एकत्र उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून पोर्टलवरूनच अर्ज सादर करावा, असे सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिला व युवतींना कौशल्य विकासाची संधी देऊन, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक महिला व युवतींनी ग्रामसमृद्धी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेऊन या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन पुलकित सिंह यांनी पुन्हा एकदा केले आहे.