मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:59 IST

मोदी-शी जिनपिंग भेट: सीमेवर शांततेवर भर, संबंध सुधारण्यासाठी सात मुद्द्यांवर सहमती

ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने नवी दिल्लीत मोदी आणि जिनपिंग यांच्यात जवळपास सात वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा झाली, ज्यात सीमा वाद, व्यापार आणि जागतिक सहकार्यावर बोलणी झाली.

मोदी-शी जिनपिंग भेट: सीमेवर शांततेवर भर, संबंध सुधारण्यासाठी सात मुद्द्यांवर सहमती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक पार पडली. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसत असतानाच ही भेट झाली. जिनपिंग यांनी जवळपास सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारताला दिलेली ही भेट दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सुमारे ५० मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेत सीमा वाद, व्यापार, लोकांमधील संपर्क आणि जागतिक आव्हानांवर सविस्तर बोलणी झाली.

या बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांपैकी सगळ्यात आधी आला तो सीमेवरील शांतता आणि स्थैर्याचा विषय. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले की भविष्यात भारत-चीन संबंध पुढे न्यायचे असतील तर सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्य ही पहिली अट आहे. दोन्ही देशांनी आधीचे सीमा करार आणि पूर्वीचे परस्पर सामंजस्य तंतोतंत पाळावे, यावर त्यांनी भर दिला.

दुसरा मुद्दा होता सीमा वादावरचा तोडगा. मोदी आणि जिनपिंग यांनी दोन्ही देशांतील नागरिकांचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या सीमा वादावर न्याय्य, वाजवी आणि दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढण्याची आपली बांधिलकी पुन्हा एकदा बोलून दाखवली.

तिसरा मुद्दा मतभेद वादात बदलू न देण्याचा होता. ऑगस्ट २०२५ मध्ये तियानजिनमध्ये झालेल्या बैठकीनंतर भारत-चीन संबंधांना जी उभारी मिळाली, त्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. परस्पर संबंधांकडे तात्पुरत्या मुद्द्यांवरून न बघता दीर्घकालीन आणि धोरणात्मक नजरेतून बघायला हवे आणि कोणताही मतभेद थेट वादात रुपांतरित होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, यावर दोघांचे एकमत झाले.

चौथा मुद्दा होता पंतप्रधान मोदींनी मांडलेली तीन 'परस्पर' तत्त्वे. भारताची बाजू मांडताना मोदींनी सांगितले की दोन्ही मोठ्या देशांमधील संबंध पुढे न्यायचे असतील तर परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हित या तीन तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे.

पाचवा मुद्दा लोकांमधील थेट संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा होता. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांतील नागरिकांमधील वाढत्या संपर्काबद्दल समाधान व्यक्त केले. सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, शिक्षण आणि व्यापारी सहकार्य आणखी सोपे करून दोन्ही देशांतील जनतेमधली दरी कमी करण्याची गरज बोलून दाखवण्यात आली.

सहावा मुद्दा व्यापारातील असमतोल आणि पुरवठा साखळीचा होता. द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करताना व्यापारातील असमतोल आणि पुरवठा साखळीशी संबंधित चिंतांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांच्या आर्थिक चिंता दूर करत सोपी, विश्वासार्ह आणि पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.

सातवा आणि शेवटचा मुद्दा जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरील एकत्रित सहकार्याचा होता. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमत वाढवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. पंतप्रधान मोदींनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेदरम्यान चीनने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशात चीनच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले.

दीर्घकाळ सुरू असलेल्या सीमा तणावानंतर भारत आणि चीन यांच्यात सुरू झालेली ही संवाद प्रक्रिया आशिया खंडात आणि जागतिक पातळीवर नवीन राजकीय आणि आर्थिक समीकरणांची सुरुवात मानली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ