दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू, बरडकिन्ही परिसरात घटना
उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातील बरडकिन्ही परिसरात शेतात वाघ मृतावस्थेत सापडला. वन विभागाने घटनास्थळाच्या आसपास कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मेंडकी उपक्षेत्रातील चिचखेडा नियत क्षेत्रात येणाऱ्या बरडकिन्ही परिसरात ही घटना घडली. घटनास्थळाच्या आसपास वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बरडकिन्ही येथे राहणारे शेतकरी पटवारी रामाजी गेडाम हे आपल्या शेतावर गेले होते. त्याच वेळी गट क्रमांक 262 मधील शेतात त्यांना एक वाघ मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती वन विभागाला दिली.
माहिती मिळताच उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड आणि वन परिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने जागेची पाहणी करून मौका पंचनामा केला. त्यानंतर मृत वाघाला शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभाग कार्यालयात नेण्यात आले.
या वेळी मानद वन्यजीव रक्षक अमोल गौरकर, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक दिलीप लाडे, सचिन शेंडे, मासाळकर तसेच क्षेत्र सहायक राकेश चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मृत वाघाचे शवविच्छेदन संजय बावणे (सहायक आयुक्त, ब्रह्मपुरी), डॉ. अतुल उरकुडे (पशुवैद्यकीय अधिकारी, ब्रह्मपुरी) आणि डॉ. मनोज पाटील (पशुवैद्यकीय अधिकारी, शंकरपूर) यांनी केले. पुढील तपासासाठी वाघाच्या विसऱ्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार मृत वाघ नर असून त्याचे वय साधारण दीड ते दोन वर्षे आहे. घटनास्थळाची परिस्थिती पाहता, त्या भागात आधीपासून असलेल्या वाघाची आणि नव्या क्षेत्रात आलेल्या वाघाची गाठ पडली असावी, असे प्रथमदर्शनी मानले जात आहे. या झुंजीतच वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी वाघाच्या शरीराचे काही भाग खाल्ल्याच्या खुणाही सापडल्या आहेत. मात्र मृत्यूचे खरे कारण काय आणि कोणत्या वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
वन विभागाने घटनास्थळाच्या आसपास कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. या कॅमेऱ्यांवर नजर ठेवून परिसरातील वाघांच्या हालचाली कशा आहेत आणि या घटनेत सामील असलेला वाघ कोणता आहे, याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शवविच्छेदन अहवाल आणि प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्ष हाती आल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.